Ganesh Visarjan 2022: बाप्पा आज्ञा असावी... राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; मुंबईचा राजा निघाला, पुण्यातही जल्लोष!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 10:31 AM2022-09-09T10:31:04+5:302022-09-09T10:32:26+5:30
Ganesh Visarjan 2022: राज्यात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांचा पाहुणचार घेऊन आज बाप्पा निरोप घेत आहेत. दहा दिवसांच्या सेवेनंतर राज्यात मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात गणेश मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
Ganesh Visarjan 2022: राज्यात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांचा पाहुणचार घेऊन आज बाप्पा निरोप घेत आहेत. दहा दिवसांच्या सेवेनंतर राज्यात मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात गणेश मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणेशोत्सव आणि मिरवणुकीवर बंधनं आली होती. त्याचा सर्व बॅकलॉग यंदाच्या मिरवणुकीत भरून निघताना दिसत आहे. मुंबईतील लालबाग परिसर असो किंवा मग पुण्यातील लक्ष्मीरोड परिसर ठिकठिकाणी भक्तांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.
लालबागमधील गणेशगल्लीतील मुंबईचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २२ फुटी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळी साडेआठ वाजता सुरुवात झाली आहे. ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत आणि गुलालाची उधळण करत मुंबईच्या राजाची मिरवणूक निघाली आहे. तर लालबागच्या राजाच्या विसर्जनाचीही तयारी अंतिम टप्प्यात आहे. थोड्याच वेळात लालबागच्या राजाची आरती होणार असून मिरवणुकीला सुरुवात होईल. पुण्यातही थोड्याच वेळात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीला सुरुवात होईल. आज सकाळीच पुण्यात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले पाहायला मिळाले.
दुसरीकडे कोल्हापुरातही विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. सकाळी नऊ वाजता मानाचा तुकाराम माळी तालीम मंडळाच्या ‘ श्री’ चे पालखी पूजन व आरतीने शाहू छत्रपती व माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते खासबाग मैदान येथे झाला आहे. प्रतिष्ठानच्या ढोल ताशा पथकाने परिसर दणाणून सोडला. फुलांनी सजविलेल्या पालखीचे शाहू छत्रपती व माजी पाटील यांच्यासह आमदार सतेज पाटील आदी मान्यवरांनी सारथ्य करत ही पालखी मिरजकर तिकटीपर्यंत वाहून नेली.
राज्यात चोख पोलीस बंदोबस्त
विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन सूचनांचं पालन करावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांसोबतच प्रशासकीय यंत्रणांनीही कंबर कसली आहे. मोठ्या उत्साहात, थाटामाटात आज गणपती बाप्पाला निरोप दिला जाईल. त्यासाठी किनारपट्टीवरही पोलिसांनी यंत्रणा उभी केली आहे. जागोजागी पोलीस बंदोबस्त आणि नाकाबंदी करण्यात आली आहे. एसआरपीएपच्या 8 तुकड्या पोलिस बंदबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. तर 3 हजार अधिकरी आणि 15 हजारांच्या वर पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आलेत.