गणेशगल्ली गणपतीच्या दानपेटीत ४० लाख रुपये
By admin | Published: September 20, 2016 03:02 AM2016-09-20T03:02:06+5:302016-09-20T03:02:06+5:30
या पत्राची संकल्पना ओमकार धुरी यांची आहे. या पत्रात मनोभावे सेवा केली त्यासाठी बाप्पा आपल्या भक्तांचे आभार मानतो आहे.
मुंबई : ‘बाप्पा’ला निरोप देऊन काही दिवस उलटले असले तरी अजूनही गणेशोत्सवाचा फिव्हर दिसून येतो आहे. मुंबई शहर-उपनगरातील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळे बाप्पाच्या दानपेटीतील रकमेची मोजदाद करण्यात व्यस्त आहेत. ‘मुंबईचा राजा’ अशी ख्याती असणाऱ्या गणेशगल्लीच्या बाप्पाच्या दानपेटीतही आतापर्यंत ४० लाखांच्या नोटा जमा झाल्याची माहिती मंडळाने दिली.
याशिवाय, अजूनही नाण्यांची मोजणी सुरू आहे. तसेच, बाप्पाच्या चरणी काही वस्तूही अर्पण करण्यात आल्या आहेत. नाण्यांची मोजणी पूर्ण झाली की, हुंड्यांमधील वस्तूंची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली मंडळाचे खजिनदार स्वप्निल परब यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)
>बाप्पाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल
‘मुंबईचा राजा’ने आपल्या भक्तांना लिहिलेले पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. या पत्राची संकल्पना ओमकार धुरी यांची आहे. या पत्रात मनोभावे सेवा केली त्यासाठी बाप्पा आपल्या भक्तांचे आभार मानतो आहे. या पत्रातील मथळा...
ओळखलात का मला तुमचा लाडका मुंबईचा राजा. पत्र लिहण्यास कारण की मी सुखरूप पोहचलो. आपण ११ दिवस केलेली धमाल मज्जा आताच आई-बाबांना सांगितली..खरे सांगायचे तर तुमचा निरोप घेताना माझ्या डोळ्यांतही अश्रू होते. पावसाच्या सरीत तुम्हाला ते समजत नव्हते....तुम्ही सर्वांनी केलेली मनोभावे सेवा आणि हो, मुंबईची सेवा करणाऱ्या खऱ्या मानकऱ्यांना आरतीचा मान दिल्याबद्दल तुमचे खूप कौतुक वाटते.. आणि हो., एक सांगायचे राहिलेच पोलिसांचा सन्मान करा तुमचे खरे विघ्नहर्ता तेच आहेत. चला तर मग पुन्हा एकदा त्याच जोषात, त्याच जल्लोषात तयारीला लागा. मी ९० व्या वर्षात पदार्पण करणार आहे. पुन्हा येईन नवीन रूपात तुमच्या भेटीला, आपल्याच गणेशगल्लीत !