आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 08:35 AM2024-08-15T08:35:38+5:302024-08-15T08:36:53+5:30
Ganeshotsav 2024 : गणपतीसाठी मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जात असतात. अशा गणेशभक्तांसाठी टोल माफी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहेत.
Ganeshotsav 2024 : मुंबई : गणेशभक्तांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूशखबर दिली आहे. गणेशोत्सवासाठी (Ganeshostav) कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. गणपतीसाठी मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जात असतात. अशा गणेशभक्तांसाठी टोल माफी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहेत. तसेच, गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे असे आदेश दिले आहेत. त्यामुळे गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे गणेशोत्सवानिमित्त कायदा व सुव्यवस्थेचा आढावा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत बुधवारी बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. गणेशोत्सवापूर्वी राज्यात सर्वत्र गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत. त्यासाठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करावा. झाडांच्या फांद्याची छाटणी करावी. कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी. मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तैनात करावेत असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. याशिवाय, गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोल माफीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे.
राज्यात गणेशोत्सवाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आवश्यक त्या तातडीच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे असे शिंदे यांनी या बैठकीत सांगितले. गेल्या वर्षी ज्या सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी दिली होती, ती यावर्षीही कायम राहील त्यासाठी शुल्क आकारणी करू नये. मंडळांना ज्या अन्य परवानग्या लागतात त्यासाठी एक खिडकी य़ोजना राबवावी. गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावर मिरवणुकीदरम्यान अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी तातडीने करावी. खड्डे बुजवताना आधुनिक तंत्रज्ञनाच्या वापराणे बनविण्यात आलेले साहित्य वापरावे. खड्डे बुजविण्याकामी हयगय करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
राज्यातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांना दिले. मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते. अशा ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्नीशमन वाहन तैनात करावेत. महापालिकांनी गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी तैनात केलेल्या अग्नीशमन वाहनासाठी कुठलेही शुल्क आकारणी करू नये, असेही निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
याचबरोबर, सर्वंत्र पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी मंडळांनी देखील सहकार्य करावे. मूर्ती विसर्जनासाठी महापालिकांनी कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पुणे येथील एका संस्थेने विसर्जित केलेल्या शाडू मातीच्या मुर्तीचा पुनर्वापराचा प्रयोग केला असून त्यांनी पुनरावर्तन हा उपक्रम सुरू केला आहे. राज्यात सर्वच महापालिकांनी हा उपक्रम राबवावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.