गणेशोत्सव मंडळांना मिळणार पाच रुपये नऊ पैसे दराने वीज
By Appasaheb.patil | Published: August 20, 2019 07:06 PM2019-08-20T19:06:38+5:302019-08-20T19:08:53+5:30
महावितरणकडून दिलासा : सार्वजनिक उत्सवासाठी स्वस्तात वीज देण्याचा निर्णय
सोलापूर : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आता महावितरणकडून वहन आकारासह पाच रुपये नऊ पैसे प्रतियुनिट या दराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी मिळणार आहे. गणेशोत्सव काळात मंडळांना २४ तासांच्या आत वीजजोडणी देण्याची तयारी महावितरणकडून करण्यात आली असून, संबंधित मंडळांनी अधिकृत वीजजोडणी करून वीज सुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केले.
सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवाच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट तीन रुपये एकोणऐंशी पैसे अधिक एक रुपया तीस पैसे वहन आकार असे वीजदर आहेत. याउलट घरगुती व वाणिज्यिक किंवा इतर वर्गवारीमध्ये वीज वापराच्या स्लॅबनुसार वेगवेगळे वीजदर निश्चित करण्यात आले आहेत. उत्सवासाठी घेतलेल्या वीजजोडणीद्वारे वीज वापरासाठी केवळ एकच वीजदर आकारण्यात येत आहे. त्यामुळे कितीही वीज वापरल्यास शेवटच्या युनिटपर्यंत केवळ पाच रुपये नऊ पैसे दर आकारण्यात येणार आहे.
या तुलनेत घरगुती व वाणिज्यिक वर्गवारीचा वीजदर स्लॅबनुसार दुप्पट व तिपटीने अधिक आहे. गणेश मंडळांना तात्पुरती वीजजोडणी देण्यासाठी पुरेसे वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उपलब्ध असलेले मीटर हे प्राधान्याने गणेश मंडळांच्या वीजजोडणीसाठी वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाची शक्यता आहे. पावसामुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी वीज यंत्रणेची योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सुरक्षेसाठी तडजोड नको...
- विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत. गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी वीज सुरक्षेबाबत उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.