गणेशोत्सव मंडळांचा सनबर्नला विरोध

By admin | Published: December 30, 2016 04:53 AM2016-12-30T04:53:08+5:302016-12-30T04:53:08+5:30

अमली पदार्थांचा वापर, कर बुडवेगिरी यांसह विदेशी संस्कृतीचा अंतर्भाव असलेल्या वादग्रस्त सनबर्न फेस्टिव्हलला पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी विरोध

Ganeshotsav Mandals protest against Sunburn | गणेशोत्सव मंडळांचा सनबर्नला विरोध

गणेशोत्सव मंडळांचा सनबर्नला विरोध

Next

पुणे : अमली पदार्थांचा वापर, कर बुडवेगिरी यांसह विदेशी संस्कृतीचा अंतर्भाव असलेल्या वादग्रस्त सनबर्न फेस्टिव्हलला पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी विरोध केला आहे. १२५ वर्षांच्या गणेशोत्सवालाही अनेक परवानग्या घेऊन पुढे जावे लागते. मात्र, सनबर्न फेस्टिव्हलला त्वरित परवानग्या मिळतात, त्यामुळे येथे कोणत्या प्रकारची त्वरित एक खिडकी योजना राबविली आहे तशी योजना गणेशोत्सवातदेखील राबविणार का? असा प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
गणेशोत्सव मंडळांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या जय गणेश व्यासपीठातर्फे पुण्यात होत असलेल्या सनबर्न फेस्टिव्हलला विरोध दर्शविणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या वेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुनील रासने, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, शनिवार पेठ मेहुणपुरा मंडळाचे पराग ठाकूर, साखळीपीर तालीम मंडळाचे भाई कात्रे, काळभैरवनाथ मंडळाचे सागर पवार, साईनाथ मंडळ ट्रस्टचे पीयूष शहा, सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई, शुभांगी आफळे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी जगताप यांनी निवेदन स्वीकारले.
शिरीष मोहिते म्हणाले, ‘‘गणेशोत्सव मिरवणुकीच्या काळात स्पिकर्स व ढोल-ताशांच्या आवाजाची मयार्दा कॅलिब्रेशन मीटरने मोजली जाते. तीच पद्धत येथे अवलंबणार का, असा गणेशोत्सव कार्यकर्त्यांचा सवाल आहे. या फेस्टिव्हलमुळे पुण्याच्या संस्कृतीला गालबोट लागण्याची शक्यता आहे.’’ विधायक मित्र मंडळ कसबा पेठ, नवदीप मित्र मंडळ, महाराष्ट्र तरुण मंडळ, निंबाळकर तालीम मंडळ, तरुण अशोक मंडळ ट्रस्ट, चक्रवर्ती अशोक मंडळ, सत्यशोधक मित्र मंडळ, वीराची तालीम मंडळ, अखिल शनिवार नवरात्र मंडळ आदी मंडळांच्या कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

वर्षानुवर्षे साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात मंडळांना मंडप, स्पिकर व इतर परवानग्या घेतल्यानंतरच उत्सव साजरा करण्यास सांगितले जाते. मिरवणुकीत अथवा उत्सवात ध्वनिक्षेपकाची मर्यादा थोडी ओलांडली, तरी मंडळांवर गुन्हे दाखल होतात. सनबर्नसाठी खूप मोठ्या प्रमाणात स्पिकर्स लावले जात आहेत. त्यांच्या मर्यादेबाबत आणि परवानग्यांबाबत काय करणार, असा सवालही त्यांनी केला.
- पराग ठाकूर, अध्यक्ष,
शनिवार पेठ मेहुणपुरा मंडळ

Web Title: Ganeshotsav Mandals protest against Sunburn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.