सुराज्यासाठी गणेशोत्सव

By admin | Published: September 13, 2015 04:49 AM2015-09-13T04:49:19+5:302015-09-13T04:49:19+5:30

आमच्या लहनपणी आम्ही औरंगाबादमध्ये गणेशोत्सवात गुलमंडीवर मेळे बघितले. ‘वऱ्हाड’कार लक्ष्मण देशपांडे हेही अशा मेळ्यांमध्ये उत्साहाने सहभागी व्हायचे. गुलमंडीवरच स्टेज उभारून

Ganeshotsav for Surajya | सुराज्यासाठी गणेशोत्सव

सुराज्यासाठी गणेशोत्सव

Next


-प्रा. डॉ. शरद भोगले (लेखक मराठवाडा संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आहेत.)

आमच्या लहनपणी आम्ही औरंगाबादमध्ये गणेशोत्सवात गुलमंडीवर मेळे बघितले. ‘वऱ्हाड’कार लक्ष्मण देशपांडे हेही अशा मेळ्यांमध्ये उत्साहाने सहभागी व्हायचे. गुलमंडीवरच स्टेज उभारून आणि व्ही. गंगाजी यांच्या माइक सिस्टीमचा वापर करून, लाइट गेले तर त्यांच्याच गॅसबत्त्या वापरून असे मेळे व्हायचे. याशिवाय विद्वान लेखक, ख्यातनाम वक्ते यांची व्याख्याने आवर्जून आयोजित केली जायची. मराठीचे ख्यातनाम प्रा. वा. ल. कुलकर्णी, पारनेरकर महाराज अशा दिग्गजांची व्याख्याने आम्हाला ऐकायला मिळायची. याशिवाय वक्तृत्व स्पर्धा, नाट्यवाचन स्पर्धा, एकांकिका असे अनेक कार्यक्रम गणेशोत्सवात व्हायचे. विसर्जनाची मिरवणूक मछली खडक, गुलमंडी आणि औरंगपुऱ्यामध्ये बघणं हा सर्वांचाच आकर्षणाचा भाग होता. आता मात्र सगळेच बदलले. लोकमान्य टिळकांनी देवघरातील गणेशपूजा चौकाचौकात आणली. उद्दिष्ट होतं स्वराज्य. आता बदललेल्या परिस्थितीत उद्दिष्ट असलं पाहिजे सुराज्य!.
आमच्या काळात लाऊड स्पीकरचा आवाज कमी पडला तर तो वाढवायला सांगायची वेळ यायची. आता डीजेचा आवाज कृपया कमी करा़ कारण आमच्या छातीत धडधड होते, अशी सांगायची वेळ आली आहे. पूर्वी स्टेजवर कमी लाइट पडला तर लोक शिट्ट्या मारायचे. आता गणेशाची मूर्तीपेक्षा लायटिंगच फार आहे. आमच्या काळात वर्गणी मागितली जायची, थोडी घासाघीस व्हायची आणि १०१ वरून शेवटी २१ रुपयांची पावती फाडली जायची; पण हा सगळा व्यवहार प्रेमाचाच. आता थोडा वेगळाच प्रकार होतो असं म्हणतात. अनेक परवानग्या लागतात. आता या सर्व परवानग्या एका खिडकीमध्ये उपलब्ध होणार असल्याची बातमी खूपच आनंददायक वाटली. वाढते ध्वनिप्रदूषण, प्रचंड रोशणाई, पर्यावरणस्नेही नसलेल्या गोष्टींचा वापर करून केलेली सजावट, थोडीशी अश्लीलता व प्रसंगी हिडीसपणा असलेले काही ठिकाणचे कार्यक्रम यामुळे आमची पिढी हा बदल मान्य करण्यास तयार नाही़ पण माझे असे मत आहे, की बदल हाच खरा स्थायी भाव आहे. या सर्व उत्सवांमध्ये तरुणाई मोठ्या संख्येने भाग घेत आहे. मुलंमुली, तरुणतरुणी प्रचंड उत्साहाने व ऊर्जेने सहभागी होतात. तरुणाईमधला उत्साह, प्रचंड ऊर्जा, अद्भुत कल्पनाशक्ती आणि उल्लेखनीय टीमवर्क म्हणजेच आजचा गणेशोत्सव.
गरज आहे ती या बदलत्या स्वरूपाच्या गणेशोत्सवाला मोठ्या मनाने स्वीकारण्याची. त्याचे कारण असे, की ही तरुणाई यानिमित्ताने एकत्र येते. पुढे याच मंडळांना समाजोपयोगी कामांमध्ये आपल्याला समाविष्ट करता येईल. म्हणजेच सुराज्यासाठी गणेशोत्सव. मग ते वृक्षारोपण असेल, जलसाक्षरता प्रसार असेल, स्वच्छता अभियान असेल. ही तरुणाईच या देशाचा आधार आहे़ तरुणाई सर्वात जास्त प्रमाणात उपलब्ध असलेला आपला महान भारत देश जगात याबाबतीत अव्वल क्रमांकावर आहे. गरज आहे या उत्सवांना एक चांगले वळण देण्याची. हळूहळू इकोफें्रडली मूर्ती तयार होत आहेत, निर्माल्य नदीमध्ये अथवा पाण्यात न टाकता वेगळ्या कुंडामध्ये टाकले जात आहे, विसर्जन मिरवणुकीचा कालावधी कमी करण्याच्या प्रयत्नाला हळूहळू यश येत आहे, एक गाव एक गणपती हळूहळू लोकांना पटेलही.
धारोष्ण दूध, साजूक तूप, रसरशीत भाज्या आणि फळे लहानपणी खायला मिळालेल्या सुदैवी पिढीचे आम्ही प्रतिनिधी आहोत आणि प्रदूषणाची शिकार बनलेली आमची तरुणाई आहे. या तरुणाईला जर योग्य वळण दिले तर प्रदूषणमुक्त, पर्यावरणस्नेही, सर्वांना आनंद देणारा गणेशोत्सव नजीकच्या भविष्यकाळात अनुभवणं सहज शक्य आहे.

 

Web Title: Ganeshotsav for Surajya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.