Ganeshotsav Toll Free Trick: टोलमाफीचा मोठा झोल! पास नाही, सोबत मोबाईल असेल तरच मिळेल गणेशोत्सव टोलमाफी, ही ट्रिक वापरा... १०० टक्के वर्किंग..
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 10:08 AM2022-08-30T10:08:37+5:302022-08-30T10:27:35+5:30
Ganeshotsav Toll Free Trick on Toll Plaza: टोल कापण्यापासून वाचायचे असेल तर नुसता पास असून चालत नाहीय, तर तुम्हाला तुमच्या मोबाईलचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला पॅसेंजर सीटवर बसलेल्या व्यक्तीची मदत घ्यावी लागणार आहे. कसे ते आम्ही तुम्हाला सांगतो...
- हेमंत बावकर
मुख्यमंत्र्यांनी मोठ्या जोशात दरवर्षीप्रमाणे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना टोलमाफी जाहीर केली. परंतू, गेल्या दोन दिवसांत अनेकांना टोलनाक्यांवर पास दाखविला तरी टोल कापला गेल्याचा अनुभव आला आहे. यामुळे लुबाडले जात असल्याची भावना अनेक गणेशभक्तांमध्ये आहे. एकही असा पासधारक नसेल, ज्याचा टोल कापला गेला नसेल, एवढ्या मोठ्या संख्येने पासधारकांची दोन दिवसांत फसवणूक झाली आहे.
जर टोल माफी घ्यायची असेल तर आरटीओ किंवा पोलिस, वाहतूक ठाण्यांत पास मिळविण्याची सोय करण्यात आली आहे. त्यातच सुटीच्या दिवशी म्हणजे शनिवारी, रविवारी आणि बुधवारी टोल माफी पाससाठी ड्युटी लावल्याने आरटीओचे अधिकारी वैतागले आहेत. पुण्यात आरटीओ अधिकारी ६.३० वाजेपर्यंत ड्युटी असताना पाच वाजण्यापूर्वीच सर्व बंद करून जाण्याची तयारी करत होता. त्यानंतर गेलेल्या गणेशभक्ताला त्याच्या नाराजीला सामोरे जावे लागल्याचा प्रकार घडला आहे.
असे असताना टोल नाक्यांवर मात्र लुटण्याचे धंदे सुरु होते. टोल नाक्यांवर गणेशभक्तांच्या पाससाठी वेगळया लेन ठेवण्यात आल्या होत्या. त्यावर फलकही लावण्यात आले होते. परंतू त्या लेनपुढे लोखंडी गेट लावण्यात आले होते. यामुळे पासधारकांना रोजच्या फास्टॅग लेनमधून जावे लागत होते. इथेही हे कर्मचारी ऑटो स्कॅन चालू ठेवून बाहेर बोलत उभे राहत होते. नेहमी ही यंत्रणा, गाडी थोडी पुढे घे... असे म्हणत मॅन्युअली टोल स्कॅन घेते, पण ती या दिवशी सुपरफास्ट असल्याचा अनुभव अनेक वाहन चालकांना आला आहे. हा प्रकार पुण्यापुढील खेड शिवापूर टोलनाका आणि कराडच्या अलीकडील टोलनाक्यावर घडला आहे.
टोल कापण्यापासून वाचायचे असेल तर...
टोल कापण्यापासून वाचायचे असेल तर नुसता पास असून चालत नाहीय, तर तुम्हाला तुमच्या मोबाईलचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला पॅसेंजर सीटवर बसलेल्या व्यक्तीची मदत घ्यावी लागणार आहे. कसे ते आम्ही तुम्हाला सांगतो...
टोल नाक्यातील लेनमध्ये घुसण्यापूर्वी तुम्हाला मोबाईल स्क्रीन ऑन करून ती तुमचा फास्टॅगच्या मागील बाजुस चालूच स्थितीत ठेवावी लागणार आहे. यासाठी तुम्हाला मोबाईल स्क्रीनचा टाईम १० मिनिटे तरी वाढवावा लागणार आहे. एवढे केल्यानंतर त्या टोलवरील कर्मचाऱ्याला पास दाखवून टोल पास करेपर्यंत मोबाईल तसाच फास्टॅगच्या मागे चिकटवून ठेवावा लागणार आहे. असे केल्याने फास्टॅगचा स्कॅनर तुमचा फास्टॅग रीड करू शकणार नाही. दुसरी ट्रीक म्हणजे तुमच्या फास्टॅगमध्ये बॅलन्स असेल तर तो शून्यावर किंवा डिपॉझिट अमाऊंटएवढाच ठेवावा लागणार आहे. तसेच ऑटो डेबिट ऑप्शन असेल तर तो डिसेबल करावा लागणार आहे. या दोन प्रकारेच तुम्ही गणेशोत्सव टोलमाफीचा लाभ घेऊ शकणार आहात.