महागड्या दुचाकींची चोरी करणारी टोळी गजाआड
By admin | Published: November 10, 2016 04:12 PM2016-11-10T16:12:03+5:302016-11-10T16:12:03+5:30
बुलेट चोरी करणा-या तीन आरोपींना २१ लाख ७५ हजार रूपये किंमतीच्या चोरीच्या २० दुचाकींसह ताब्यात घेतले. त्यामध्ये १७ बुलेट आणि तीन अन्य दुचाकी आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 10 - महागड्या दुचाकी ते सुद्धा प्रामुख्याने बुलेट चोरणारी अहमदनगर, पाथर्डी येथील टोळी वाकड पोलिसांनी जेरबंद केली. बुलेट चोरी करणा-या तीन आरोपींना २१ लाख ७५ हजार रूपये किंमतीच्या चोरीच्या २० दुचाकींसह ताब्यात घेतले. त्यामध्ये १७ बुलेट आणि तीन अन्य दुचाकी आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर आणि मुंबई येथे त्यांनी केलेले दुचाकी चोरीचे २० गुन्हे उघडकीस आले, अशी माहिती वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्रीधर जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पिंपरी-चिंचवड शहरात सक्रीय असलेली चोरट्यांची टोळी अहमदनगर, पाथर्डी येथे असल्याची माहिती सहायक पोलीस निरिक्षक बालाजी पांढरे तसेच तपास पथकातील कर्मचारी शाम बाबा यांना मिळाली. त्यानुसार पाथर्डी येथे पथक रवाना झाले. नंबर प्लेट नसलेल्या बुलेटवरून आलेल्या दोन चोरट्यांना अत्यंत चपळाईने त्यांनी पकडले. गणेश विश्वनाथ भाबड (वय २४,रा.आगसखांड, पाथर्डी) अंबादास विक्रम मिसाळ (वय ३०,रा.पिंपळनेर, शिरूरकासार,बीड ) अशी त्या दोन आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, सागर वसंत गिते (वय १९,रा.पाथर्डी) या आणखी एका साथीदाराचे नाव पुढे आले. त्यांची गुन्ह्याची पद्धत लक्षात घेता, एक लाख ते दीड लोख रुपये किंमतीच्या बुलेट दुचाकीच ते चोरत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. बुलेट विक्रीतुन मोठी रक्कम मिळत असल्याने या टोळीचे चोरी करताना, बुलेट हेच टार्गेट होते. अहमदनगर तसेच बीड येथे बुलेट विक्री करण्याच्या उद्देशाने त्यांनी एका ठिकाणी नंबर नसलेल्या १७ बुलेट व अन्य तीन दुचाकी ठेवल्याचे पोलिसांनी शोधून काढले. विविध ठिकाणी केलेल्या गुन्हयांची कबुली आरोपींनी दिली.
अप्पर पोलीस आयुक्त उत्तर विभाग शशीकांत शिंदे, पिंपरी विभागाचे पोलीस उपायुकत डॉ. बसवराज तेली, परिमंडल दोनचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, चतुशृंगी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त वैशाली जाधव-माने, पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके, वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्रीधर जाधव, अमृत मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही कारवाई केली. त्यामध्ये सहायक पोलीस निरिक्षक पांढरे,पोलीस उपनिरिक्षक तुकाराम फड, पोलीस कर्मचारी शाम बाबा, बिभिषण कन्हेरकर, रोहिदास टिळेकर, अशोक दुधवणे, प्रमोद भांडवलकर, रमेश गायकवाड, भैराबा यादव, स्वप्निल वराडे, विक्रांत गायकवाड या पोलीस कर्मचा-यांनी मोलाची कामगिरी केली.