सोलापूरच्या मुलीवर गँगरेप, वसईचे ३ अटकेत
By admin | Published: June 17, 2016 12:45 AM2016-06-17T00:45:36+5:302016-06-17T00:45:36+5:30
सोलापूर रेल्वे स्थानकावर एकट्या बसलेल्या १४ वर्षाच्या मुलीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून तिला वसईतील गवराईपाडा येथे आणून तिच्यावर आरोपीने आपल्या दोन मित्रांसोबत गँगरेप
वसई : सोलापूर रेल्वे स्थानकावर एकट्या बसलेल्या १४ वर्षाच्या मुलीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून तिला वसईतील गवराईपाडा येथे आणून तिच्यावर आरोपीने आपल्या दोन मित्रांसोबत गँगरेप केला असून वालीव पोलीसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
सोलापूरमध्ये राहणारी एक मुलगी वडिलांशी भांडण झाल्याने घर सोडून निघून सोलापूर रेल्वे स्टेशनवर येऊन बसली होती. मात्र, तिच्याजवळ पैसे नसल्याने पुढे काय करायचे अशा विचारात ती असतांना वसई पूर्वेकडील गवराईपाडा परिसरात राहणाऱ्या राजेश याने तिच्याशी ओळख वाढवून तिला नोकरी देण्याचे आमिष दाखवले व ७ जून २०१६ रोजी तिला वसई येथील घरी आणले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ८ जूनला त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर कंपनीत त्याच्या सोबत काम करणाऱ्या राजकुमार व फरीद या मित्रांनीही घरी येऊन तिच्यावर बलात्कार केला. तिघांनी सलग तीन दिवस तिच्यावर वारंवार अत्याचार केले.
या मुलीकडे कपडे नसल्याने तिने शेजारी राहणाऱ्या महिलेकडून कपडे घेतले व तिला घडला प्रकार सांगितला.
ही गोष्ट राजेशला समजल्यावर त्याने तिला बेदम मारहाण केली. दोन दिवसांनी राजेश कामावर गेल्यानंतर शेजारी राहणाऱ्या महिलेने तिला मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात नेले.
त्याठिकाणी मुलीने आपल्यासोबत झालेल्या पाशवी अत्याचाराची हकीकत कथन केल्यानंतर पोलीसांनी बलात्कार, व पोस्को अन्वये देखील शून्य नंबरने गुन्हा दाखल करून तो वालीव पोलीस ठाण्याकडे वर्ग केला.
(प्रतिनिधी)
तीन ठिकाणाहून वळल्या आरोपींच्या मुसक्या
- वालीव पोलिसांनी गँगरेपमधील तिन्ही आरोपींना बुधवारी मध्यरात्री वेगवेगळ्या ठिकाणाहून पकडले आहे.
- पोलिसांनी आरोपी राजेश, राजकुमार आणि फरीद यांच्याविरोधात मारहाण, बलात्कार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माळी करत आहेत.
- एवढा प्रकार भर वस्तीत झाला तरी पिडीतेने आरडा ओरड कशी व का केली नाही असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर तपासादरम्यान शोधले जाणार आहे.