गंगेचे पाणी यमुना, नर्मदेपेक्षा स्वच्छ

By admin | Published: January 4, 2017 11:47 PM2017-01-04T23:47:37+5:302017-01-04T23:47:37+5:30

कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या गंगा नदीचे पाणी पुराणांपासून पवित्र मानण्यात येते.

Ganges water is cleaner than Yamuna, Narmada | गंगेचे पाणी यमुना, नर्मदेपेक्षा स्वच्छ

गंगेचे पाणी यमुना, नर्मदेपेक्षा स्वच्छ

Next

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 4 - कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या गंगा नदीचे पाणी पुराणांपासून पवित्र मानण्यात येते. वैज्ञानिकदृष्ट्यादेखील समोर आलेले निष्कर्ष काहीसे असेच आहेत. गंगेच्या पाण्यातील प्रदूषणाचा अभ्यास नीरीतर्फे करण्यात आला. यात नर्मदा व यमुना या नद्यांपेक्षा गंगा नदीचे पाणी जास्त स्वच्छ असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे गंगेच्या संपूर्ण प्रवाहात प्रदूषित पाणणी मिसळत असले तरी प्रत्यक्षात पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी होत नसल्याचेदेखील वैज्ञानिकांना आढळून आले आहे. नीरीचे संचालक डॉ. राकेशकुमार यांनी हा खुलासा केला आहे.
विज्ञान भारतीतर्फे बुधवारी सायंकाळी सायंटिफिक सभागृहात आयोजित गंगेची रोगनिवारण शक्ती- वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर आयोजित व्याख्यानादरम्यान ते बोलत होते. गंगा नदीसोबतच नर्मदा व यमुना नदीचा विविध ठिकाणी जाऊन नीरीच्या पथकाने अभ्यास केला. कानपूर, वाराणसी, पटना येथे गंगा नदी सर्वात जास्त प्रदूषित आहे. मात्र तरीदेखील पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण फारसे कमी होत नाही. रात्रीदेखील हे प्रमाण नियंत्रित असते. हे नेमके कशामुळे होते, हा वेगळ््या संशोधनाचाच विषय आहे. याशिवाय गंगा नदीत बॅक्टेरियोफेज हे विशिष्ट विषाणू आढळून येतात. त्यांच्यामुळे पाणी स्वच्छ राहते. यमुना व नर्मदेपेक्षा हे प्रमाण गंगेत खूप जास्त आहे. गंगेत वैज्ञानिकांनी बाहेरून जीवाणू टाकले. मात्र बॅक्टेरियोफेजच्या प्रभावामुळे त्यांची वाढ झाली नाही. त्यामुळेच गंगेच्या स्वच्छ पाणी जास्त दिवस साठवून ठेवले असतानादेखील त्याला दुर्गंध येत नाही, असे डॉ. राकेशकुमार यांनी सांगितले.
गंगेच्या पाण्यात प्राणवायूचे प्रमाण नियंत्रित असले तरी ई-कोलायचे प्रमाण वाढीस लागत आहे व ही बाब निश्चितच चिंताजनक आहे. गंगेत विविध नाल्यांचे पाणीदेखील मोठ्या प्रमाणात सोडले जाते. त्यामुळे प्रदूषण वाढते आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

अ‍ॅग्रोकेमिकल गंगेसाठी घातक
गंगा नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणावर शेती करण्यात येते. ही जमीन सुपिकच असते. मात्र तरीदेखील अ‍ॅग्रोकेमिकल वापरण्यात येतात. केमिकल्सयुक्त खतांमुळे गंगेसोबतच सर्व नद्या सर्वात जास्त प्रभावित होत आहेत. नद्यांमधील प्रदूषणासाठी धरणे व बांधदेखील काही प्रमाणात कारणीभूत आहे. नद्यांचे पाणी अविरल कसे वाहत राहील, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शिवाय सेंद्रिय शेतीचादेखील जास्तीत जास्त उपयोग व्हायला हवा, असे डॉ. राकेशकुमार म्हणाले.

नद्यांच्या गुणवत्तेत महाराष्ट्र मागे

नद्यांचे पाणी स्वच्छ ठेवण्यात विविध जीवाणू व विषाणूंचा मोठा सहभाग असतो. मात्र त्यांना योग्य प्रमाणात प्राणवायूची आवश्यकता असते. पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण ह्यबीओडीह्णने (बायोलॉजिकल आॅक्सिजन डिमांड) मापतात. बीओडीवरून नद्यांच्या पाण्याची गुणवत्ता ठरते. यादृष्टीने मोजमाप केले असता महाराष्ट्रातील नद्या गुणवत्तेत सर्वात मागे आहेत. याशिवाय उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथील नद्यांचा महाराष्ट्रापाठोपाठ क्रमांक लागतो.

 

Web Title: Ganges water is cleaner than Yamuna, Narmada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.