सांगलीच्या कारागृहात गुंडाची आत्महत्या
By admin | Published: October 21, 2016 01:23 AM2016-10-21T01:23:52+5:302016-10-21T01:23:52+5:30
गळफास घेतला : प्रेम प्रकरणात अटकेत
सांगली : प्रेम प्रकरणातून तरुणीची सोशल मीडियावरून बदनामी केल्याप्रकरणी अटकेत असलेला बामणोली (ता. मिरज) येथील गुंड संदीप पांडुरंग सुर्वे (वय २६) याने सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी पहाटे चार वाजता ही घटना उघडकीस आली. बरॅक क्रमांक चारमधील मोरीजवळील खिडकीला चादरीने गळफास घेतला. मात्र, आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.
कुपवाडलगतच्या बामणोली येथील बहिणीकडे सुर्वे राहत होता. गेल्या काही महिन्यांपासून तो एका वृत्तवाहिनीचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून वावरत होता. त्याचे बामणोलीतील एका तरुणीशी प्रेमसंबंध जुळले होते. तिच्याशी विवाह करण्यासाठी त्याने नोंदणीही केली होती. याची माहिती त्याने कुपवाड पोलिस ठाण्यात दिली होती. सुर्वेविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने, पोलिसांनी याची माहिती संबंधित तरुणीच्या घरी दिली. सुर्वे गुंड असल्याचे समजताच या तरुणीने लग्नास नकार दिला. हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले होते. पोलिसांसमोर सुर्वेने संबंधित तरुणीशी कोणतेही संबंध ठेवणार नाही, तिला त्रास देणार नाही, असे लिहून दिले होते. मात्र, पोलिस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर त्याने तिच्याबद्दल सोशल मीडियावर अश्लील संदेश पाठवून तिची बदनामी केली. हा प्रकार समजताच तरुणी व तिच्या वडिलांनी कुपवाड पोलिस ठाण्यासमोर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पोलिसांनी सुर्वेला ताब्यात घेतले होते.
तरुणीची बदनामी व विनयभंगासह तीन गुन्हे सुर्वेविरुद्ध दाखल केले होते. या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्याला पोलिस कोठडी मिळाली होती. १८ आॅक्टोबरला त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. त्याला येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ठेवले होते. कारागृहाच्यादुसऱ्या मजल्यावरील बरॅक क्रमांक चारमध्ये तो होता. बुधवारी सायंकाळी सर्व कैद्यांसोबत त्याने जेवण घेतले व रात्री झोपी गेला. पहाटे चार वाजता एक कैदी लघुशंकेसाठी शौचालयात निघाला होता. त्यावेळी त्याला मोरीजवळील खिडकीला सुर्वे गळफासाने लटकत असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच कारागृह अधीक्षक सुशील कुंभार, पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांनी भेट देऊन पाहणी केली. सुर्वेने चादर फाडून त्याच्या साहाय्याने गळफास घेतला होता. न्यायाधीशांसमोर कारागृहातच मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. मिरजेतील शासकीय रुग्णालयात विच्छेदन तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. (प्रतिनिधी)