गँगस्टर अश्विन नाईकला दादरमध्ये अटक
By admin | Published: December 21, 2015 02:04 AM2015-12-21T02:04:24+5:302015-12-21T02:04:24+5:30
दादरमधील बांधकाम व्यावसायिकाकडून १५ लाखांची खंडणी घेत असताना, गँगस्टर अश्विन नाईकसह त्याच्या चार साथीदारांना दादर पोलिसांनी रविवारी अटक केली.
मुंबई: दादरमधील बांधकाम व्यावसायिकाकडून १५ लाखांची खंडणी घेत असताना, गँगस्टर अश्विन नाईकसह त्याच्या चार साथीदारांना दादर पोलिसांनी रविवारी अटक केली. नाईकने यापूर्वी याच बांधकाम व्यावसायिकाच्या भागीदाराकडून तब्बल २५ लाख रुपये उकळले होते.
दादर परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाचे पार्टनरशिपमध्ये इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ९ डिसेंबर रोजी नाईक आणि त्याच्या साथीदारांनी या बांधकाम व्यावसायिकाच्या भागीदाराचे रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अपहरण केले. अपहरणानंतर सुभाषनगर येथे अपहरण केलेल्यास जीवे ठार मारण्याची धमकी नाईकने दिली, तसेच ५० लाखांची खंडणी आणि नव्या इमारतीत ६ हजार स्वेअर फूट जागा देण्याची मागणी नाईकने केली. त्यानुसार घाबरलेल्या या व्यक्तीने २५ लाख रुपये नाईकला दिले होते. त्यानंतर उर्वरित रक्कम देण्यासाठी २० तारखेपर्यंतची वेळ त्याने नाईककडे मागितली होती.
ठरल्याप्रमाणे रविवारी दुपारच्या सुमारास नाईक आणि त्याचे साथीदार दादर येथील भवानी शंकर रोडवर उर्वरित खंडणी घेण्यासाठी येणार होते. त्यापूर्वीच संबंधित व्यावसायिकाने नाईकच्या भीतीला न जुमानता, दादर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक निशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक सदानंद
राणे यांच्या तपास पथकाने नाईकसाठी सापळा रचला आणि कारवाई केली.
एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन आणि आता बिल्डर व्यवसायात असणारा अश्विन नाईक हा चौथ्यांदा खंडणीच्या गुन्ह्यात गजाआड झाला आहे. एन.एम. जोशी परिसरात राहण्यास असलेला नाईक २००९ मध्ये सर्व गुन्ह्यांतून मुक्त झाला होता. अश्विन नाईकवर १९९४ साली त्याच्यावर गोळीबार झाला होता. त्यात त्याने दोन्ही पाय गमावले. तेव्हापासून आजपर्यंत नाईक व्हीलचेयर वरच आहे.
अश्विन नाईक बिल्डर व्यवसायात शिरला. अनेक वेळा त्याचे विविध प्रकरणांत ३ ते ४ वेळा समोर आले होते. २०१४ मध्ये प्रकाश वसंत पाटकर या व्यक्तीने नाईक आणि त्याच्या साथीदारावर घर खाली करण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी त्याला या प्रकरणी अटक केली होती, पण त्यानंतर तो जामिनावर सुटला होता.