गँगस्टर नाईकच्या कोठडीत वाढ
By admin | Published: December 25, 2015 03:17 AM2015-12-25T03:17:13+5:302015-12-25T03:17:13+5:30
खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या गँगस्टर अश्विन नाईकसह पाच जणांच्या कोठडीत २७ तारखेपर्यंत वाढ करण्यात आली आहे
मुंबई : खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या गँगस्टर अश्विन नाईकसह पाच जणांच्या कोठडीत २७ तारखेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या गुन्ह्यात फरार असलेल्या अल्पवयीन तरुणासह चार जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पियो हस्तगत करण्यात आली आहे.
गुरुवारी वाढीव कोठडीसाठी नाईकसह त्याच्या पाचही साथीदारांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांच्या कोठडीत २७ तारखेपर्यंत वाढ केली आहे. त्या पाठोपाठ या गुन्ह्यात सहभागी असलेल्या एका १७ वर्षीय तरुणासह चंदन तस्कर सन्नी पाल, मिलिंद परब (२२), अविनाश खेडकर (१७) ला गुरुवारी अटक करण्यात आली. पाटील आणि चंदन तस्कर केळूस्कर यांच्या आर्थिक व्यवहारातून वाद होता. हा वाद समोर आणून नाईक या प्रकरणातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, खंडणीसाठी नाईकने पाटीलला केलेले कॉल रेकॉर्ड, तसेच सीसीटीव्ही फुटेज यामुळे नाईकच्या सुटकेची शक्यता धूसर आहे. आरोपींपैकी परब, खेडकर आणि अल्पवयीन मुलगा वगळता, केळूस्कर, जनार्दन सकपाळ, प्रथमेश परब, राजेश तांबे यांच्यावर हत्या, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. केळूस्कर आणि पाल याला चंदन तस्करीमध्ये अटक करण्यात आली होती. (प्रतिनिधी)