Ganpati Festival -जातीधर्माच्या भिंती मोडून मुस्लिम कुटुंबांच्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 02:24 PM2020-08-27T14:24:37+5:302020-08-27T14:26:37+5:30
कोल्हापूर जिल्हयातील अस्लम जमादार आणि सांगली जिल्ह्यातील ढवळी येथील रमजान मुल्ला यांनी जातीधर्माच्या भिंती ओलांडून गणेशाची पूजा केली आहे.
कोल्हापूर/सांगली - कोल्हापूर जिल्हयातील अस्लम जमादार आणि सांगली जिल्ह्यातील ढवळी येथील रमजान मुल्ला यांनी जातीधर्माच्या भिंती ओलांडून आपल्या घरात गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे.
हिंदू मुस्लीम ऐक्याच्या अनेक घटना आणि अनेक प्रसंग आजूबाजूला घडताना पाहतो. एखादं संकट आलं किंवा सण, उत्सवादरम्यान विविधतेने एकतेचे दर्शन आपल्याला घडतच असतं. प्रस्थापित मानसिकतेमुळे शक्य होत नसतानाही भारतीय परंपरेत मिसळलेल्या मुस्लिम कुटुंबांनी आपल्या घरात गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे .
मुळचे कोल्हापुरचे असणारे अस्लम जमादार हे सध्या (कळंब) उस्मानाबाद येथे नायब तहसिलदार आहेत. त्यांच्या तीन वर्षांच्या चिमुकल्याने अब्रारने अम्मीकडे गणपती आणायचा हट्ट धरला.
अर्शिया यांनी ड्यूटीवर असलेल्या अस्लम जमादार यांना याबाबत सांगितलं. त्यानंतर काही वेळाने घरात बाप्पांचं आगमन झाल्याचा फोटोच अर्शिया यांनी अस्लम जमादार यांना पाठवला. घरात बाप्पा आल्याने अब्रार अतिशय खूश आहे.
मागच्या वर्षी अब्रार शेजाऱ्यांसोबत गणपती आणायला गेला होता. तेव्हापासूनच त्याला बाप्पाचा लळा लागला. परंतु शेजाऱ्यांची बदली झाल्याने यंदा अब्रारला गणपती आणायला जाता आलं आणि मग त्याने बाप्पाला घरीच आणण्याचा हट्ट धरला. विशेष म्हणजे जातीधर्माच्या भिंती मोडून अस्लम आणि अर्शिया जमादार या दाम्पत्याने लेकराचा हट्ट पुरवत गणपती घरी आणला विधीवत त्याची प्राणप्रतिष्ठा करुन आरतीही केली.
प्रस्थापित मानसिकतेमुळे जे शक्य होत नाही असं वाटत होतं ते प्रामाणिक निरागसतेनं केलं. जर त्याच्या मनात आलं तर बाप्पा मुसलमानांच्या घरी सुद्धा आनंदाने येतो आणि त्याला आणल्यावर आनंदपण सोबत येतो याची आज प्रचिती झाली. आता काय ते फक्त एकच मागणं आहे बाप्पाकडं. तुला स्वीकारायची निरागसता अशीच त्याच्या मनात आयुष्यभर राहूदे. बाप होऊन जेंव्हा विचार केला तेंव्हा मुलाचा आनंद आणि बाप्पाचं माझ्या घरात येणं दोन्ही ही खूप सहजपणे स्वीकारता आलं. आयुष्यात ही सहजता अशीच कायम राहूदे रे बाप्पा.
- अस्लम जमादार,
नायब तहसिलदार, (कळंब )उस्मानाबाद
(मुळ कोल्हापुर)
ढवळी येथे घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना
सांगली : मिरजेच्या ढवळी येथे जाती-पातीचे बंधन तोडून एका मुस्लीम कुटुंबाने आपल्या घरात गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. कोरोनामुळे यंदा गणेश मंडळांनी रस्त्यावर मंडप टाकून गणपती न बसवण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते.
या पार्श्वभूमीवर ढवळी गावातील गणेशनगर येथील एकता मंडळाला गणपती कुठे बसवायचा हा प्रश्न पडला होता. मात्र, मंडळाचे कार्यकर्ते रमजान मुलाणी यांनी स्वत:च्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करून पेच सोडवला आणि जिल्ह्यातील नागरिकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
कोरोनामुळे यंदा सार्वजनिक मंडळांचे गणपती स्थपना करू नका, असे प्रशासनाने केलेल्या आवाहनामुळे गणपती कुठे बसवायचा, हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातही मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होणार होते. तसेच, प्रथेनुसार एका घरात दोन गणपतींची प्रतिष्ठापना होत नाही. त्यामुळे, कार्यकर्त्यांच्या घरी गणपती बसवणे शक्य नव्हते. त्यामुळे, मी माझ्या घरी गणपती बसवणार, असे मंडळाला कळवले व त्यानुसार घरात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली. आता मी, माझी पत्नी व कुटुंब दररोज गणपती बाप्पाची आराधना करतो.
- रमजान मुलाणी,
(ढवळी)मिरज, सांगली.