गणपतीपुळे उन्हाळी पर्यटन हंगामासाठी सज्ज
By admin | Published: April 22, 2015 11:13 PM2015-04-22T23:13:22+5:302015-04-23T00:08:09+5:30
विविध उपक्रम : अजूनही आरक्षणास थंड प्रतिसाद
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे उन्हाळी पर्यटन हंगामासाठी सज्ज झाले आहे. यावर्षीही पर्यटकांच्या स्वागतासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.गणपतीपुळेसह निवेंडी, मालगुंड, वरवडे, रीळ, उंडी, केसपुरी, भंडारपुळे, नेवरे, कोतवडे या ठिकाणची रिसॉर्ट्स, हॉटेल्स, लॉजिंग आदी सर्व रंगरंगोटी, डागडुजी करुन सेवा सुविधा देण्यास सज्ज झाली आहेत. पर्यटन हंगाम असल्याने वातानुकुलीत यंत्रणा सज्ज आहे. भारनियमनाच्या काळात गैरसोय होऊ नये, याकरिता जनरेटर, इन्व्हर्टरची सुविधा उपलब्ध करुन पर्यटकांचे समाधान करण्यास येथील सर्वच व्यावसायिक आतुरले आहेत.
गणपतीपुळेसह आरे-वारे व मालगुंड बीचवर विविध खेळांचे उपक्रम राबवले जात आहेत. आरे-वारे बीचवर मोटरबोट, स्कूटर व पँडल बोटिंग आदी जलक्रीडा पर्यटकांना उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्याला पर्यटकांचा प्रतिसाद वाढत आहे. गणपतीपुळे बीचवर जलक्रीडा, उंट व घोडा सफारी, रेल्वेगाडी, बंपिंग उडी, बीचवर राऊंड मारण्यासाठी बाईक राईड, खेळण्यासाठी विविध खेळांचे साहित्य उपलब्ध करून देण्यात येते. यामध्ये बॅटबॉल, हॉलीबॉल, टेनिस बॉल, रिंग आदी विविध खेळांचे साहित्य पर्यटकांना बीचवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
नारळपाणी, भेळपुरी, बर्फगोळा, सरबत आदी सुविधाही बीचवर उपलब्ध असून, पर्यटकांना येथील आठवणी घेऊन जाण्यासाठी बीच फोटो काढण्यासाठी मुले तयार असतात. एका मिनिटात फोटो मिळत असल्याने पर्यटकही आनंदाने येथील आठवणी घेऊन जातात. तसेच मालगुंड बीचवर बोटिंगचे विविध प्रकार तसेच पॅरासिलिंग व पॅराग्लायडिंगची सुविधा मालगुंड येथील भूषण मेहेंदळे, विद्याधर पुसाळकर व सनी मयेकर या युवकांनी पर्यटकांसाठी सुरु केल्या आहेत.
गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री लंबोदर दर्शनासाठी भक्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, गर्दी टाळण्यासाठी दर्शन रांगेची व्यवस्था केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करण्यात येते. सर्व भाविकांना १२ ते २ खिचडी प्रसाद व सायंकाळी ७ ते ८ पुलाव प्रसाद देण्यात येतो. तसेच भक्तनिवास लवकरच भक्तांच्या सेवेत रुजू होणार आहे. पर्यटन हंगाम लक्षात घेता ग्रामपंचायत गणपतीपुळे यांच्यामार्फत एकदिशा मार्ग तसेच पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. स्मशानभूमी परिसरातील मैदान आणि भंडारपुळे मार्गावरील मैदानात ही सोय करण्यात आली आहे.
पर्यटन हंगाम १ मे पासून सुरु होईल, असा अंदाज पर्यटक व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात राहण्याची व्यवस्था असल्याने म्हणावे तसे आरक्षण झाले नसल्याने पर्यटक व्यावसायिकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)