राज्यात गारठा; मुंबईचे किमान तापमान १८ अंश सेल्सिअस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 07:00 AM2019-12-28T07:00:52+5:302019-12-28T07:01:22+5:30
ब्रह्मपुरी @ ८.७ : मध्य महाराष्टÑ, मराठवाड्यात पडणार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
मुंबई : मुंबईसह राज्याचे वातावरण ढवळून निघत आहे. कधी पाऊस, कधी मळभ तर कधी थंडी; अशा तिहेरी बदलाचे वारे वाहत आहेत. त्यात आता हवामान खात्याने राज्याला पावसाचा इशारा दिला असतानाच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या किमान तापमानात घट झाल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. शुक्रवारी मुंबईचे किमान तापमान १८ तर ब्रह्मपुरी येथील किमान तापमान ८.७ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असतानाच दुसरीकडे २९ डिसेंबरला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात सर्वांत कमी किमान तापमान ब्रह्मपुरी येथे ८.७ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
कोकण, गोवा आणि मराठवाड्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ तर कोकण, गोवा, मराठवाड्याच्या काही भागात लक्षणीय वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.
मुंबईचा विचार करता गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे किमान तापमान २२ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात येत होते. शिवाय प्रदूषणातही सातत्याने भर पडत होती. शुक्रवारी मुंबईची हवा मध्यम स्वरूपाची नोंदविण्यात आली असतानाच किमान तापमानातही घट झाली. ते २२ अंशावरून १८ अंशावर घसरल्याची नोंद हवामान खात्याने केली.
मुंबईत राहणार आकाश ढगाळ
२८ आणि २९ डिसेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, १९ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.
गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे
२८ डिसेंबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.
२९ डिसेंबर : मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील.
३० आणि ३१ डिसेंबर : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोव्यात हवामान कोरडे राहील.
राज्यातील शहरांचे शुक्रवारचे
किमान तापमान (अंश सेल्सिअस)
सांताक्रुझ १८
डहाणू १६.८
पुणे १६.८
जळगाव १२
महाबळेश्वर १४.९
मालेगाव १४.२
नाशिक १४.२
उस्मानाबाद १५
औरंगाबाद १४
परभणी १७.९
नांदेड १४
बीड १८
अकोला १४.८
अमरावती १२.६
बुलडाणा १२.५
ब्रह्मपुरी ८.७
चंद्रपूर १०.६
गोंदिया १०.५
नागपूर १२.६
वाशिम १६.२
वर्धा १३.४
यवतमाळ १४