बॉलीवूड गाण्यांवर रंगणार गरबा, आधुनिकतेसोबतच परंपरा जपण्याकडे कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 02:21 AM2017-09-23T02:21:46+5:302017-09-23T02:21:48+5:30
नवरात्र म्हटले की गरबा-दांडिया खेळण्यात तरुणाई दंग असते. दरवर्षी या दांडिया आणि गरब्यामध्ये पारंपरिक गुजराती गाण्यांचे वर्चस्व दिसून येते. मात्र यंदा हा ट्रेंड काहीसा बदलून बॉलीवूडच्या गाण्यांवर गरबा, दांडियाचा ठेका धरताना दिसत आहेत. त्यामुळे या बॉलीवूडच्या गाण्यांना तरुणाईची पसंती मिळत असल्याचे दिसून येते आहे.
कुलदीप घायवट
मुंबई : नवरात्र म्हटले की गरबा-दांडिया खेळण्यात तरुणाई दंग असते. दरवर्षी या दांडिया आणि गरब्यामध्ये पारंपरिक गुजराती गाण्यांचे वर्चस्व दिसून येते. मात्र यंदा हा ट्रेंड काहीसा बदलून बॉलीवूडच्या गाण्यांवर गरबा, दांडियाचा ठेका धरताना दिसत आहेत. त्यामुळे या बॉलीवूडच्या गाण्यांना तरुणाईची पसंती मिळत असल्याचे दिसून येते आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून नवरात्रौत्सवात केवळ गुजराती, राजस्थानी संगीत वाजविले जाते. त्यामुळे गरबा, दांडियामध्ये ठरावीक वर्गाला ही गाणी आपलीशी वाटतात. परंतु, यंदा आयोजकांनी यावर तोडगा काढून बॉलीवूडमधील नवी हिट गाणी दांडियामध्ये वाजविण्याचे ठरविले आहे. जेणेकरून जास्तीत जास्त तरुण पिढीला आकर्षित करण्यात येत आहे. त्यामुळे यंगस्टर्सही खूश असून गरबा-दांडियात सहभागी होण्याचा त्यांचा उत्साह दुणावला असल्याचे दिसते आहे.
दांडिया-गरब्यासाठी तरुणाई महिन्याभरापूर्वीच तयारी करताना दिसून येते. त्यात मग अगदी प्रशिक्षणासाठी शिकवण्या लावण्यापासून ते अगदी कपडे-दागिन्यांच्या खरेदीपर्यंत तरुणाई या तयारीत व्यस्त असते. यंदा साल्सा, बॉलीवूड गरबा, राजस्थानी नृत्यप्रकार काठियावाडी हुडो नवरात्रौत्सवामध्ये सादर करताना दिसून येतील. त्यात खास नवरात्रौत्सवासाठी वेगवेगळ्या नृत्यप्रकारांमध्ये तरुणाईच्या डान्स स्टेप बसवण्यात आलेल्या आहेत. या वेळेस बॉलीवूड गाण्यांची चलती आहे त्यानुसार बॉलीवूड गरबा प्रकार शिकवण्यावर जास्त भर देण्यात आला आहे, अशी माहिती नृत्यदिग्दर्शक मयूर मांडवकर याने दिली. या वर्षीच्या नवरात्रौत्सवात तरुणाई पारंपरिक वेशभूषा, अलंकार, धोती, सदरा, घागरा-चोळी, केडिया आणि त्यावर भपकेदार कोट, चष्मा अशा प्रकारे नटणार आहेत. जेणेकरून आधुनिकतेमध्ये परंपरा जपण्याचा तरुणाईचा कल आहे. तसेच अशा प्रकाराचा ‘नवरात्री ट्रेंड’ संपूर्ण मुंबईमध्ये दिसून येणार आहे. यंदाचा नवरात्रौत्सव संपूर्ण बॉलीवूडमय होणार आहे.
>नवरात्रौत्सवावर बॉलीवूड टच
या वर्षी नवरात्रीमध्ये गरबा शिकण्यासाठी तरुणाईने गर्दी केली आहे, यात विशेषकरून ८० टक्के सहभाग हा मुली व महिलांचाच आहे. वेगवेगळ्या वयोगटातील नृत्यप्रेमींचा यात समावेश असतो. ५ ते १० जणांचे गु्रप करून शिकवले जाते. यंदा बॉलीवूड फॅशन करताना लोक दिसून येत आहेत. राजस्थानी-गुजराती गरबा, दांडिया शिकवण्यात आला आहे.
- आनंद शिल्पकार, नृत्यदिग्दर्शक