कचऱ्याने दमले प्रशासन

By admin | Published: May 6, 2017 02:50 AM2017-05-06T02:50:29+5:302017-05-06T02:50:29+5:30

तब्बल १ हजार टन कचऱ्यावर शहरातील वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये रोज प्रक्रिया होत आहे, तरीही ६०० टन कचरा शिल्लक राहतो

The garbage dump administration | कचऱ्याने दमले प्रशासन

कचऱ्याने दमले प्रशासन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तब्बल १ हजार टन कचऱ्यावर शहरातील वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये रोज प्रक्रिया होत आहे, तरीही ६०० टन कचरा शिल्लक राहतो. शिल्लक कचरा दिशा व अजिंक्य या अनुक्रमे रामटेकडी व हडपसर येथील प्रकल्पांमध्ये साठवून ठेवला जात होता; मात्र या दोन्ही प्रकल्पांची क्षमता आता संपुष्टात येत चालली आहे. येत्या चार दिवसांत डेपोची समस्या सुटली नाही, तर शहर कचराकुंडी होण्याची दाट शक्यता आहे.
शिल्लक कचऱ्याच्या विल्हेवाटीची व्यवस्था करताना प्रशासन आता दमले असून, महापौर व पालकमंत्री परदेशातच असल्याने महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या उर्वरित पदाधिकारीही हतबल झाले आहेत. सलग २० दिवसांनंतरही कचरा डेपोची समस्या अद्याप आहे तिथेच आहे. उरुळी येथील ग्रामस्थांनी कचरा टाकू न देण्याचा आपला निर्धार कायम ठेवला आहे. त्यांच्याशी चर्चा करण्याचे प्रशासनाचे व पदाधिकाऱ्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.
सध्या शहरात एकूण ४८ प्रकल्प सुरू आहेत. त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त कचरा जिरवला जात आहे. वडगाव येथील प्रकल्प ५० टनांचा असूनही तिथे १०० टन कचरा रोज जिरवला जातो. काही प्रभागांमधील ५ ते ७ टन क्षमतेच्या प्रकल्पांमध्ये दीड पट जास्त कचरा दिला जातो. हे प्रकल्प महापालिकेने चालविण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या संस्थांना दिले आहेत. त्यांना कर्मचारी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, तसेच प्रकल्प सतत सुरूच ठेवावा, असेही सांगण्यात आले आहे. या मार्गाने सध्या शहरातील सुमारे १ हजार टन कचरा जिरवला जात आहे. त्यामुळेच सलग २० दिवस होऊनही शहरातील कचरा समस्येने अद्याप उग्र स्वरूप धारण केलेले नाही.
मात्र, आता रोजचा शिल्लक ६०० टन कचरा ज्या दिशा व अजिंक्य या प्रकल्पांमध्ये साठवून ठेवला जात होता, त्या प्रकल्पांची क्षमता आता संपली आहे. रोज तिथे महापालिकेची कचरा जमा केलेली वाहने येऊन कचरा डंप करतात.
तिथेच ओला व सुका असे वर्गीकरण करण्यात येऊन दोन्ही प्रकारचा कचरा साठविण्यात येत आहे. सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये रोजच्या रोज कचरा जात असल्यामुळे दोन्ही प्रकल्पांमधील कचरा रोज भर पडत असल्याने वाढतच चालला आहे. यावर उपाय म्हणून कचरा जमा करणाऱ्या वाहनचालकांना कचरा शहरातील उड्डाणपुलांच्या खाली असणाऱ्या पोकळीत साठवण्यास सांगण्यात आले होते.
धायरी येथील उड्डाणपुलाच्या खाली असा कचरा साठवण्यात येत होता; मात्र स्थानिक नागरिकांच्या तक्रारी सुरू झाल्यावर शुक्रवारी दुपारी तो तिथून हलवण्यात आला.

सर्व प्रयत्न करून, वेगवेगळी आश्वासने दिल्यानंतरही उरुळी ग्रामस्थ ऐकायला तयार नसल्याने आता प्रशासनालाही चिंता भेडसावू लागली आहे.
महापालिकेत सत्ताधाऱ्यांपैकी उपमहापौर नवनाथ कांबळे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ हेही आता ग्रामस्थांबरोबर चर्चा करून त्रस्त झाले आहेत. भिमाले म्हणाले, की प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
शहरातील प्रकल्पांची क्षमता वाढविण्यात येत आहे, येत्या १० दिवसांत वडगावमध्ये दोन प्रकल्प नव्याने सुरू करत आहोत. प्रशासनाला शहरात कचरा साठू देऊ नये, असे सांगण्यात आले़


विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनीही प्रश्न सुटावा, अशीच राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा असल्याचे स्पष्ट केले. मात्र, सत्ताधाऱ्यांमधील वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित नाहीत, सरकार म्हणजे मुख्यमंत्री यात लक्ष घालायला तयार नाहीत; त्यामुळे विनाकारण प्रश्न चिघळत चालला आहे, अशी टिका त्यांनी केली.

काँग्रेस, मनसे, शिवसेना हेही आता या विषयावर आंदोलन करून, सत्ताधारी भाजपावर टीका करून शांत झाले आहेत. सत्ताधाऱ्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन या विषयावर चर्चा घडवून आणली पाहिजे, असे मत विरोधी पक्षांकडून व्यक्त होत आहे.

Web Title: The garbage dump administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.