क्या बात! कचरावेचक मुलांनी घेतला पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 06:05 PM2021-06-29T18:05:24+5:302021-06-29T18:06:00+5:30
कचरावेचक मुलं केवळ झाडं लावून थांबली नाहीत तर त्यांनी ही झाडं दत्तक घेत त्यांच्या सुयोग्य संगोपनाचीही काळजी घेत आहेत.
झाडं दत्तक घेत केला पर्यावरण रक्षणाचा जागर
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत अनेकांनी वृक्षरोपण करत त्यासोबत सेल्फी काढले. त्यापैकी काही रोपट्यांची आताची परिस्थिती काय आहे? हा कदाचित संशोधनाचा विषय ठरू शकेल. कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर कचरा वेचणारे हात आता
पर्यावरणाच्या रक्षणासाठीही पुढे सरसावले आहेत. विशेष म्हणजे ही कचरावेचक मुलं केवळ झाडं लावून थांबली नाहीत तर त्यांनी ही झाडं दत्तक घेत त्यांच्या सुयोग्य संगोपनाचीही काळजी घेत आहेत. कल्याणातील पाणबुडे नगर आदिवासी वस्तीतील मूलांनी आपल्या परिसरात अनेकविध झाडं लावून त्यांचं रक्षण करण्याचीही जबाबदारी घेतली आहे.
अनुबंध संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला. पाणबुडे नगर आदिवासी वस्तीतील मुलांनी आवळा, चिंच, जाम, पेरू, कडुलिंब, लिंबू, सिताफळ आदी प्रकारची झाडं लावली. केवळ झाडं लावून ही मुलं थांबली नाहीत, तर ती जगण्यासाठी या झाडांचे पालकत्वही या मुलांनी घेतले आहे. आणि ही जबाबदारी ही मुलं अत्यंत योग्य पध्दतीने पार पाडत असून गेल्या 3 आठवड्यांमध्ये ही झाडं हळूहळू बारसं धरू लागल्याचे दिसत आहे. मुलांना लहानपणापासून झाडं आणि निसर्गाबाबत गोडी लागण्यासह त्यांच्यामध्ये पर्यावरण रक्षणाचे भानही जागृत करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे अनुबंध संस्थेचे विशाल जाधव यांनी सांगितले. चिमुकल्यांनी केलेला हा उपक्रम सर्वांसाठी एक आदर्श असून केवळ झाडं लावून फोटोसेशन न करता त्यांचं संगोपनही वेळेनुसार केलं पाहिजे हा संदेश या मुलांनी दिलाय.