कचरा साठतो २०० ठिकाणी
By admin | Published: June 27, 2016 01:02 AM2016-06-27T01:02:44+5:302016-06-27T01:02:44+5:30
शहरात ज्या ठिकाणी वारंवार कचरा साठला जातो, अशी २०० ठिकाणे महापालिकेने निश्चित केली आहेत.
पुणे : शहरात ज्या ठिकाणी वारंवार कचरा साठला जातो, अशी २०० ठिकाणे महापालिकेने निश्चित केली आहेत. याठिकाणचा कचरा उचलण्यासाठी पालिकेकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. कचरा वाहनांचे नियोजन करून, शहरात कुठेही पडलेला कचरा २४ तासांच्या आत उचलला जाईल, अशी व्यवस्था घनकचरा विभागाने केली आहे.
शहरातील प्रमुख रस्ते; तसेच उपनगरांत अनेक ठिकाणी कचरा साठतो, तो वेळीच उचलला जात नाही, त्यामुळे अस्वच्छता निर्माण होऊन शहराच्या प्रतिमेला बाधा पोचत होती. यावर मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रसच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांच्या पुढाकारातून महापौर प्रशांत जगताप यांनी बैठक बोलावली होती. सहआयुक्त आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप, क्षेत्रीय अधिकारी, स्वच्छ संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘‘वारंवार कचरा साठणाऱ्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करून तेथील स्वच्छतेवर भर द्यायला हवा. कचरागाड्यांचे वेळापत्रक तयार करून त्यानुसार कचरा उचलला गेला पाहिजे, हे वेळापत्रक नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे. तसेच, कंटेनरमध्ये कचरा न टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच, संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यावर काटेकोर देखरेख ठेवली पाहिजे.’’
स्वच्छतेसाठी असलेल्या नवीन मशिन्सचा वापर दिवस-रात्र करण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठी खासगी कंपन्यांकडून जो निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे, त्यामाध्यमातून ही कामे केली जात आहेत, असे घनकचरा विभागाने स्पष्ट केले. स्वच्छतेबाबत महापौरांनी सूचना दिल्या. (प्रतिनिधी)
स्वच्छतागृहे दत्तक घ्यावीत
सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये देखभाल चांगल्याप्रकारे होत नाही. खासगी उद्योग, व्यवसाय समूहांच्या मदतीने स्वच्छतागृहे दत्तक घेऊन त्यांची देखभाल दुरुस्ती करण्याची सूचना वंदना चव्हाण यांनी केली. सार्वजनिक स्वच्छतागृहांचीही देखभाल करण्यासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयांत प्रत्येकी एक जेट मशीन पुरविण्यात येणार आहे.