गार्डन वेस्टचा साचला ढीग
By admin | Published: June 11, 2016 01:01 AM2016-06-11T01:01:50+5:302016-06-11T01:01:50+5:30
शटर मशिन महिनाभर बंद असल्याने कोथरूड कचरा डेपोमध्ये गार्डन वेस्टचा ढीग मोठ्या प्रमाणावर साठला आहे.
कोथरूड : झाडाच्या फांद्यांचा भुगा करणारे शटर मशिन महिनाभर बंद असल्याने कोथरूड कचरा डेपोमध्ये गार्डन वेस्टचा ढीग मोठ्या प्रमाणावर साठला आहे. या मशिनवर काम करण्यासाठी ठेकेदारामार्फत दोन कामगार लावलेले आहेत. ठेकेदाराला मशिन बंद असल्याच्या काळातील कामासाठीचा मोबदला देण्यात येऊ नये, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
गार्डन वेस्टमध्ये झाडाच्या फांद्यांबरोबर इतरही कचरा येत असल्याचे येथील कचऱ्याच्या ढिगाचे निरीक्षण केल्यावर दिसते. त्यामुळे कचरा संकलनाच्या पद्धतीला शिस्त लावण्याची गरज असल्याचे कामगारांनी सांगितले. यासंदर्भात आरोग्य निरीक्षक अविनाश तेलकर यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कोथरूड डेपोमध्ये सोसायटीतील कटिंगचा कचरा साधारण दोन ते अडीच टन
येतो.
उद्यान विभागाचा नेमका किती कचरा येतो ते सांगता येणार नाही. येथील शटर मशिनची क्षमता रोज पाचशे ते सातशे किलो कटिंगची आहे. येथे साठलेले कटिंग वाहून नेण्यासाठी महापालिकेच्या व्हेईकल डेपोकडे मागणी केली आहे. परंतु आम्हाला गाडी उपलब्ध झालेली नाही.
गाडी उपलब्ध होताच हा कचरा सुस व मुंढवा येथील शेतकऱ्यांना खतासाठी देण्यात येईल. (वार्ताहर)