यात्रांमध्ये गजबजले कुस्त्यांचे आखाडे!
By Admin | Published: May 4, 2017 02:15 AM2017-05-04T02:15:47+5:302017-05-04T02:15:47+5:30
पुणे जिल्ह्यामध्ये यात्रांचा हंगाम उत्साहात पार पडला असून बैलगाड्यांच्या शर्यतींना बंदी असली तरी गावोगावी यात्रा कमिट्यांनी कुस्त्यांचे
तुषार मोढवे / चासकमान
पुणे जिल्ह्यामध्ये यात्रांचा हंगाम उत्साहात पार पडला असून बैलगाड्यांच्या शर्यतींना बंदी असली तरी गावोगावी यात्रा कमिट्यांनी कुस्त्यांचे आखाडे भरवून यात्रांमध्ये रंगत आणली!
बैलगाडाशौकिनांनीही दुधाची तहान ताकावर भागवत कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी आखाड्यांमध्ये गर्दी केली. दिवाळी संपली, की पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये यात्रांचा हंगाम सुरू होतो तो अगदी वैशाख शुद्ध द्वितीयापर्यंत चालू राहतो. या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये परंपरेनुसार आपल्या ग्रामदैवताची यात्रा उत्साहात साजरी केली जाते. यात्रेनिमित्त शहरांमध्ये गेलेले चाकरमानी आवर्जून कुटुंबासह गावी येतात, ग्रामदैवत, कुलदैवताचे दर्शन घेतात आणि पारंपरिक यात्रा उत्सवात उत्साहाने सहभागी होतात. यात्रा म्हटलं, की बैलगाड्यांच्या शर्यती, भारुड, तमाशा यांसारखे मनोरंजनाचे कार्यक्रम आणि दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा आखाडा आणि पुन्हा रात्री सांस्कृतिक कार्यक्रम असे साधारण उत्सवाचे स्वरूप असते. यात्रेनिमित्त पाहुण्यांना, मित्रमंडळींना आवर्जून स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले जाते.
गावांमधील बैलगाडाशौकीन दिवसभर घाटामध्ये शर्यती पाहायच्या आणि पाहुण्यांच्या घरी जाऊन भोजन करायचे, वेळ असला तर रात्री भारुड किंवा तमाशा पाहायचा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या गावी जायचे असा पूर्वीचा कार्यक्रम असे. परंतु आता बैलगाड्यांच्या शर्यती बंद असल्याने गावोगावच्या यात्रांची गर्दी कमी झाली. यात्रेच्या पहिल्या दिवशी बैलांची गावातून मिरवणूक काढून ग्रामदैवताची पालखी काढणे व हारतुरे करणे एवढेच काम राहिले आहे. मात्र बैलगाड्यांच्या शर्यती बंद झाल्या तरी यात्रा आयोजकांनी दुसऱ्या दिवशी होणाऱ्या कुस्त्यांच्या आखाड्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. नुकताच कुस्ती या खेळावरील आमिर खानचा ‘दंगल’ चित्रपट येऊन गेल्याने ग्रामीण भागात पुन्हा कुस्तीचे पर्व सुरू झाले आहे. यात्रांमध्ये आखाड्यामध्ये आता गावोगावच्या प्रसिद्ध मल्लांना आमंत्रित करून त्यांच्या निकाली कुस्त्या लावण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी लाखो रुपयांची बक्षिसेही ठेवण्यात येत आहेत.
राज्यपातळी, देशपातळीवरील विविध कुस्ती स्पर्धांमधील विजेत्या, उपविजेत्या मल्लांना आमंत्रित करून त्यांचीही कुस्ती खेळवली जात आहे. त्यामुळे कुस्तीशौकिनांची संख्या वाढली.
कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, अहमदनगर या जिल्ह्यांमधून नामांकित मल्ल मोठ्या गावांच्या यात्रांमध्ये हजेरी लावू लागले आहेत. त्यामुळे लहान मुले व युवकांमध्येही कुस्तीच्या खेळाबद्दल आकर्षण निर्माण झाले आहे.
अनेक गावांमधून पालक आपल्या मुलांना एक-दोन महिने कोल्हापूरच्या तालमींमध्ये पाठवू लागले आहेत. ग्रामीण भागामध्ये हळूहळू लोप पावत चाललेल्या या खेळाला यात्रांमध्ये मिळत असलेल्या प्रतिसादामुळे पुन्हा जीवदान मिळाले आहे.