गॅसवाहक टँकर उलटून गळती
By admin | Published: November 15, 2015 02:14 AM2015-11-15T02:14:39+5:302015-11-15T02:14:39+5:30
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास एक गॅसवाहू टँकर रस्त्यातच उलटला. त्यातून गॅस गळती सुरू झाल्यामुळे घबराट निर्माण झाली होती.
खेड (जि. रत्नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास एक गॅसवाहू टँकर रस्त्यातच उलटला. त्यातून गॅस गळती सुरू झाल्यामुळे घबराट निर्माण झाली होती.
लोटेतील विनिती आॅरगॅनिक कंपनीच्या पथकाने केलेल्या प्रयत्नात गॅस गळतीचे प्रमाण कमी झाले. मात्र पूर्ण थांबले नाही. महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
हा टँकर भारत गॅस कंपनीचा असून, तो मुंबईहून गोव्याकडे एल.पी.जी. घेऊन जात होता. गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या दोन आयशर टेम्पोंना मार्ग मोकळा करुन देण्याचा प्रयत्न करीत असताना हा टँकर रस्त्याच्या बाजूलाच उलटला. टँकरवरील गॅसची टाकी रस्त्याच्या बाजूला गटारात उलटून पडली आणि टँकरचा पुढील भाग (चालकाची केबीन) टाकीपासून वेगळा झाला. टँकरचालक रवी विटकर याने उडी मारल्याने तो बचावला. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी घटनास्थळापासून दोन्ही बाजूला अर्धा किलोमीटर अंतरावरच वाहतूक थांबवली. वाहतुकीला पर्याय काढून कशेडीपासून खेडच्या दिशेने अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या तुळशी-विन्हेरे-महाड मार्गे वाहतूक सुरू करण्यात आली. (प्रतिनिधी)