गॅस गिझरच्या गळतीत आर्किटेक्ट तरुणीचा मृत्यू
By Admin | Published: January 20, 2015 12:41 AM2015-01-20T00:41:12+5:302015-01-20T00:41:12+5:30
गरम पाण्यासाठी बाथरूममधील गॅस गिझर सुरू केल्यानंतर त्यामधून झालेल्या वायूगळतीमुळे श्वास गुदमरून आर्किटेक्ट तरुणीचा मृत्यू झाला़ ही घटना शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली़
पुणे : गरम पाण्यासाठी बाथरूममधील गॅस गिझर सुरू केल्यानंतर त्यामधून झालेल्या वायूगळतीमुळे श्वास गुदमरून आर्किटेक्ट तरुणीचा मृत्यू झाला़ ही घटना शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली़
संकल्पा प्रदीप गुप्ते (वय २६, रा. बी-१२, निलगिरी हाईट्स, सेनापती बापट रस्ता) असे या तरुणीचे नाव आहे़
संकल्पा ही शनिवारी नेहमीप्रमाणे आवरून आॅफिसला जाण्यासाठी तयार होत होती. अंघोळीकरिता बाथरूममध्ये गेल्यावर तिने पाणी गरम करण्यासाठी गॅस गिझर सुरूकेला. त्यामधून वायूगळतीला सुरुवात झाली. बेशुद्ध झालेल्या संकल्पाचा यामध्येच मृत्यू झाला. या वेळी तिची आई घरामध्ये होती़ संकल्पा बेशुद्ध पडल्याची घटना उशिरा लक्षात आली़ औंध शासकीय रुग्णालयात तिचे शवविच्छेदन केल्यानंतर रविवारी दुपारी तिच्यावर वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
(प्रतिनिधी)
दुबईत घेतले शिक्षण
वडील प्रदीप यांना दोन वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर आई गृहिणी आहे. संकल्पाला एक विवाहित बहीण आहे. दुबईत एका खासगी कंपनीत मार्केटिंगची नोकरी करणाऱ्या प्रदीप यांना संकल्पाने खूप शिकून मोठे व्हावे, अशी इच्छा होती. गेल्याच वर्षी तिने आर्किटेक्टची पदवी संपादन केली होती. दुबईला बहिणीकडे राहून तिने या विषयात प्रावीण्य मिळवले होते.