बुकिंग करताना बुडू शकते गॅस सबसिडी

By admin | Published: July 19, 2015 11:04 PM2015-07-19T23:04:51+5:302015-07-20T00:04:58+5:30

सावधान : ग्रामीण भागातून अनेक तक्रारी दाखल

Gas subsidy may drop during booking | बुकिंग करताना बुडू शकते गॅस सबसिडी

बुकिंग करताना बुडू शकते गॅस सबसिडी

Next

प्रवीण देसाई -कोल्हापूर -गॅस सिलिंडर मोबाईलवरून बुकिंग करताना आता सबसिडी नाकारण्यासाठी ‘शून्य’ व पाहिजे असल्यास ‘एक’ असे नवीन दोन सुधारित पर्याय समाविष्ट करण्यात आले आहेत. ते निवडताना चुकून आकड्यांची अदलाबदल झाल्यास सबसिडी बुडण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील अनेक ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे. ही तांत्रिक चूक झाल्यास त्याचे पुढील निराकरण कसे करायचे, याचे उत्तर गॅस वितरकांकडेही नाही. सध्या ही योजना इंडेन कंपनीकडून सुरू झाली असली तरी ‘एचपीसी’ व ‘बीपीसी’ कंपन्यांकडेही ती लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. सबसिडीच्या या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जवळपास दहा तक्रारी ग्राहक पंचायत संघटनेकडे आल्या आहेत.
गेल्या वर्षभरापासून मोबाईलवरून गॅस बुकिंगची नोंदणीहोत आहे. गॅस कंपनीच्या दिलेल्या क्रमांकावर ग्राहकांनी आपल्या विक्रेत्याकडे जो मोबाईल नंबर रजिस्टर केला आहे त्याद्वारे कॉल केल्यास गॅस बुकिंग होतो. ग्राहकांना घरबसल्या ही सुविधा कंपन्यांनी जरी उपलब्ध करून दिली असली तरी ती सध्या मोठी डोकेदुखी झाल्याचे दिसते. कारण जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून मोबाईलवरून गॅस बुक करताना गॅसची सबसिडी नको असेल तर ‘शून्य’ व पाहिजे असल्यास ‘एक’ बटण दाबण्याची सूचना येते. त्यामध्ये चुकून ‘शून्य’ बटण दाबल्यास सर्वसामान्यांना मिळणारी सबसिडी बंद होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका शाहूवाडी व चंदगड तालुक्यातील इंडेन गॅस कंपनीच्या ग्राहकांना बसला आहे. सबसिडी बुडण्याच्या भीतीने ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. सद्य:स्थितीला विशेषत: ग्रामीण भागात या अडचणी जाणवत आहेत. ग्रामीण भागातील सर्वच ग्राहक सुशिक्षित असतील असेही नाही. त्यामुळे चुकून ‘शून्य’ बटण दाबले गेल्याने ग्राहकांना नाहक मन:स्ताप होत आहे.
याबाबत पुढे काय करायची यासंबंधीची विचारणा करायला गेल्यावर गॅस विक्रेत्यांजवळही त्याचे उत्तर नाही. कारण ही तांत्रिक सुधारणा थेट कंपनीकडूनच झाली असल्याने विक्रेत्यांनाही त्यात काही हस्तक्षेप करता येत नाही.


मोबाईलवरून गॅस बुकिंगसाठी सुरू केलेली पद्धत योग्यच आहे परंतु ग्रामीण भागातील लोकांना याबाबत अडचणी येत आहेत त्यामध्ये कंपन्यांनी ग्राहकांचे आर्थिक नुकसान होऊ नये याची खबरदारी घ्यावी.
-अरुण यादव, जिल्हाध्यक्ष, ग्राहक पंचायत

मोबाईलने बुकिंग करताना घ्या काळजी
यासंदर्भात ग्राहकांच्या हितासाठी लढणाऱ्या ग्राहक पंचायत या संघटनेकडे जिल्ह्यातून जवळपास दहा तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील सात व चंदगडमधील तीन तक्रारींचा समावेश आहे. एखादी नवीन योजना आणताना कंपनीने सुरुवातीला आपल्या गॅस एजन्सीमधील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यानंतर ग्राहकांनाही या संदर्भात सविस्तर माहिती दिली पाहिजे तसेच या योजना पूर्णपणे कार्यान्वित होऊन ग्राहकांमध्ये रूळत नाहीत तोपर्यंत जुन्या पद्धती बंद करणे योग्य नसल्याचा ग्राहकांचा सूर आहे.

Web Title: Gas subsidy may drop during booking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.