पेट्रोलपंप मालकांवरही लवकरच गंडांतर
By admin | Published: July 2, 2017 04:14 AM2017-07-02T04:14:30+5:302017-07-02T04:14:30+5:30
राज्यातील घोटाळेबाज पेट्रोलपंपांविरुद्ध ठाणे पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईचा मोर्चा लवकरच पंपमालकांकडे वळणार आहे. पेट्रोलपंपांवर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्यातील घोटाळेबाज पेट्रोलपंपांविरुद्ध ठाणे पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईचा मोर्चा लवकरच पंपमालकांकडे वळणार आहे. पेट्रोलपंपांवर हेराफेरी करण्यासाठी वापरलेल्या इलेक्ट्रॉनिक्स चिप्स प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविल्या असून, त्याविषयी अहवाल प्राप्त झाल्यानंतर, पंपमालकांवर कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वाहनांमध्ये इंधन भरणाऱ्या डिस्पेन्सिंग युनिटमध्ये हेराफेरी करून, ग्राहकांना कमी पेट्रोल देणाऱ्या पेट्रोलपंपांविरुद्ध ठाणे पोलिसांनी गत दोन आठवड्यांपासून कारवाईचा धडाका लावला आहे. या कारवाईअंतर्गत आतापर्यंत ६२ पेट्रोलपंपांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४० पंपांना सील ठोकण्यात आले. डोंबिवली आणि ठाण्यातील दोन पंप पूर्णत: सील करण्यात आले.
उर्वरित पंपांवरील ज्या डिस्पेन्सिंग युनिटमध्ये गडबड आढळली, केवळ तेच युनिट सील करण्यात आले. सर्व प्रकरणांमध्ये १८ आरोपींवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये १० तंत्रज्ञ, काही व्यवस्थापक आणि कर्मचारी, तर दोन पंपमालकांचा समावेश आहे.
पोलिसांनी पेट्रोलपंपांवरून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक चिप्स आणि हेराफेरीसाठी वापरलेले इतर साहित्य प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले आहे. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, पोलिसांच्या कारवाईचा मोर्चा पंपमालकांकडेही वळू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.
चार पेट्रोलपंपांची तपासणी
शुक्रवारी पोलिसांनी इंडियन आॅइलच्या चार पेट्रोलपंपांची तपासणी केली. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील जयदास तारे यांचा समर्थ कृपा आॅटोमोबाइल्स, ठाणे जिल्ह्यातील वाडा येथील कांता सिंग यांचा सागर आॅटोमोबाइल्स, नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील दहिगाव रणगिरी येथील रामनाथ फकीरचंद अँड सन्स आणि सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील सुरूर येथील शरद चव्हाण यांच्या द्वारकाधीश पेट्रोलपंपाचा समावेश आहे. त्यापैकी सातारा जिल्ह्यातील पेट्रोलपंप वगळता, उर्वरित तिन्ही पंपांवर हेराफेरी आढळली.
सद्यस्थितीत ठाणे पोलिसांची पथके नागपूर, धुळे, चंद्रपूर आणि यवतमाळ भागांत कार्यरत आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांमधील पेट्रोलपंपांवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.