मरेच्या फेऱ्यांना फाटकांचा फटका
By admin | Published: July 10, 2015 03:08 AM2015-07-10T03:08:45+5:302015-07-10T03:08:45+5:30
मध्य रेल्वेच्या मेन लाइन आणि हार्बरवरील पाच फाटकांमुळे रेल्वे प्रशासनाला मोठा फटका बसत असून, महिन्याला दोन हजारपेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द होत असल्याचे समोर आले आहे.
मुंबई : मध्य रेल्वेच्या मेन लाइन आणि हार्बरवरील पाच फाटकांमुळे रेल्वे प्रशासनाला मोठा फटका बसत असून, महिन्याला दोन हजारपेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द होत असल्याचे समोर आले आहे. फाटकांमुळे लोकल फेऱ्या रद्द होण्याचे प्रमाण वर्षभरात वाढले असून, त्यामुळे लोकल गाड्यांबरोबरच प्रवाशांनाही लेटमार्क लागत आहे. लोकल फेऱ्या रद्द होण्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी हे फाटक सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत बंद करण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र हे प्रयत्नही फोल ठरत आहेत.
मध्य रेल्वेमार्गावरील मेन लाइनचा उपनगरापर्यंतचा पसारा सीएसटी ते कल्याण, कर्जत, खोपोली, कसारा आणि हार्बरवर नवी मुंबईपर्यंत आहे. मेन लाइनवरील कळवा, दिवा, ठाकुर्ली हे तीन तर हार्बरवर शिवडी आणि चुनाभट्टी हे दोन फाटक असून, याच फाटकांमुळे लोकल गाड्यांना मोठा फटका बसत आहे. हे फाटक २४ तासांत जवळपास १00 वेळा उघडतात. वर्षभरापूर्वी फाटक उघडण्याचे प्रमाण हे कमी होते. मात्र स्थानिकांच्या मागणीनुसार फाटक उघडण्याचे प्रमाण वाढले आणि त्याचाच फटका बसत असल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. एक वर्षापूर्वी दिवसाला ३0 लोकल फेऱ्या रद्द होत होत्या. मात्र फाटक उघडण्याचे प्रमाण वाढल्याने आता दिवसाला ७0 ते ८0 लोकल फेऱ्या रद्द होत आहेत. हे पाहता वर्षभरापूर्वी ९00 लोकल फेऱ्या रद्द होत असताना आता सुमारे २ हजारपेक्षा जास्त फेऱ्या रद्द होत आहेत.