कोयना धरण क्षेत्रात पाऊस, वक्री दरवाजे पुन्हा उघडले; ४ हजार २०४ क्यूसेकने विसर्ग सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 02:46 PM2022-10-15T14:46:02+5:302022-10-15T14:54:47+5:30
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाने हजेरी लावल्याने कोयना धरणाचे वक्री दरवाजे पुन्हा उघडण्यात आले आहेत.
कोयनानगर :कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाने हजेरी लावल्याने कोयना धरणाचे वक्री दरवाजे पुन्हा उघडण्यात आले आहेत. शनिवारी सकाळी आठ वाजता धरणाचे दोन वक्री दरवाजे एक फुटाने उघडून तर पायथावीज गृहातून कोयना नदीत ४ हजार २०४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात वक्री दरवाजे अपवादानेच उघडावे लागत होते. मात्र, यावर्षी ऑक्टोबर महिन्यात तिसऱ्यांदा, तर एकूण सहा वेळा वक्री दरवाजे उघडले आहेत.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवस पाऊस पडत असल्याने व धरणाची साठवण क्षमता संपुष्टात आल्याने शनिवारी सकाळी आठ वाजता धरणाच्या सहा वक्री दरवाजांपैकी दोन दरवाजे एक फुटाने उचलले. त्यातून ३ हजार १५४ क्युसेक व या अगोदर शुक्रवारी धरणाच्या पायथा वीज गृहाच्या एका जनित्राद्वारे वीज निर्मिती करून १ हजार ०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करत पूर्वेकडे कोयना नदीपात्रात ४ हजार २०४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Chandrakant Patil: 'नाराजांची समजूत काढण्याची व्यवस्था शिंदे-फडणवीस सरकारकडे'
कोयना धरणात सध्या १०५.०३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता संपुष्टात येत असल्याने धरणाचे दोन दरवाजे एक फुटाने वर उचलून व धरण पायथा वीज गृहातील एका जनित्राद्वारे वीज निर्मिती करून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. सध्या धरणात सरासरी ४ हजार ९४४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. उपलब्ध पाणीसाठा १०५.०३ टीएमसी आहे. १ जूनपासून आजपर्यंत कोयना येथे ४ हजार ६२४ मिलिमीटर, नवजा येथे ५ हजार ६६१ मिलिमीटर व महाबळेश्वर येथे ६ हजार ०९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
आठ वर्षांत ऑक्टोबर महिन्यात केवळ तीनदा वक्री दरवाजे उघडण्यात आले
ऑक्टोबर महिन्यात पाऊस कमी अथवा बंद झालेला असतो. धरण व्यवस्थापनाकडून परिचालन सूचीप्रमाणे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी शक्यतो पायथा वीज गृहातूनच विसर्ग केला जातो. त्यामुळे वक्री दरवाजे उडण्याची स्थिती कमी वेळा येते. गत आठ वर्षांत ऑक्टोबर महिन्यात केवळ तीनदा वक्री दरवाजे उघडण्यात आले होते. यामध्ये २०१६, २०१७ व २०१९ ला ऑक्टोबर महिन्यात वक्री दरवाजे उघडण्यात आले होते.