नाईकांविरोधातील पुरावे जमविण्यास सुरुवात, तक्रारदार महिलेची झाली वैद्यकीय चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 08:28 AM2022-04-19T08:28:29+5:302022-04-19T08:30:26+5:30
आमदार नाईक यांच्यासोबत लिव्ह अँड रिलेशनशिपचे संबंध असल्याचा दावा नेरूळमधील एका महिलेने केला आहे. परंतु, अनेकदा आपल्या इच्छेविरोधात शरीरसंबंध ठेवले गेल्याने महिलेने नाईक यांच्या विरोधात नेरूळ पोलिसांकडे तक्रार केली आहे.
नवी मुंबई : आमदारगणेश नाईक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या महिलेकडून नाईकांविरोधातले पुरावे जमा करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून तपासकार्याला गती देण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारी तक्रारदार महिलेचीदेखील वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे.
आमदार नाईक यांच्यासोबत लिव्ह अँड रिलेशनशिपचे संबंध असल्याचा दावा नेरूळमधील एका महिलेने केला आहे. परंतु, अनेकदा आपल्या इच्छेविरोधात शरीरसंबंध ठेवले गेल्याने महिलेने नाईक यांच्या विरोधात नेरूळ पोलिसांकडे तक्रार केली आहे. तक्रारदार महिलेने सुरुवातीला त्यांच्याच मर्जीने संबंधाचा उल्लेख केल्यानंतर तीन दिवसांनी त्यांनी बलात्काराची तक्रार केली आहे. महिला आयोगासह ठिकठिकाणी तक्रार केल्यानंतर नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याच महिलेला वर्षभरापूर्वी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नाईक यांच्यावर सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे नाईक परिवाराच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने नेरूळ पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. त्यासाठी तक्रारदार महिलेची वैद्यकीय चाचणी करून त्यांनी केलेल्या आरोपांच्या अनुषंगाने पुरावे जमा करण्यावर जोर दिला आहे.
पुरावे मिळाल्यास होऊ शकते अटक -
सबळ पुरावे हाती लागताच नाईक यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते. त्यामुळे नाईक समर्थकांसह विरोधकांचेदेखील या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे, तर गणेश नाईक यांच्यावर दाखल असलेल्या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू असून, तपासाअंती योग्य कारवाई केली जाईल असे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी सांगितले आहे.