विधानसभा महायुद्धासाठी मेळावे, वज्रमुठीची तयारी; आचारसंहिता पुढच्या महिन्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 01:09 PM2024-08-10T13:09:37+5:302024-08-10T13:10:30+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्षा बंगल्यावर संयुक्त बैठक झाली. त्यात संयुक्त प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई : राज्यातील सत्तारूढ महायुती विरुद्ध विरोधी पक्षात असलेली महाविकास आघाडी असे विधानसभा निवडणुकीचे महायुद्ध तोंडावर असताना आता दोघांनीही संयुक्त प्रचारावर भर दिला आहे. मेळावे, जाहीर सभांद्वारे ऐक्याचे प्रदर्शन केले जाईल. निवडणूक आचारसंहिता सप्टेंबरमध्ये लागू होण्याची शक्यता आहे पण त्या आधीच प्रचाराचा धुराळा उडविला जाणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्षा बंगल्यावर संयुक्त बैठक झाली. त्यात संयुक्त प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिली सभा कोल्हापुरात २० ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. तिन्ही नेत्यांच्या विभागीय पातळीवर सात सभा होतील, आठवी समारोपाची सभा मुंबईत होणार आहे. या शिवाय तिन्ही पक्षांचे नेते जिल्हाजिल्ह्यांत जाहीर सभा, मेळावे होतील. महायुतीमध्ये मतभेद नाहीत आणि आम्ही एकदिलाने निवडणुकीला सामोरे जात असल्याचा संदेश त्यातून दिला जाईल. लोकसभा निवडणुकीत तीन पक्षांमध्ये समन्वय नसल्याची बाब समोर आली होती. हा समन्वय वाढविण्याच्या दृष्टीने समन्वय समित्या जिल्हावार स्थापन करण्याचाही महायुतीचा विचार आहे.
ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री ?
महाविकास आघाडी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडणुकीपूर्वी जाहीर करण्याची शक्यता नाही, असे सूत्रांनी सांगितले. एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जावे आणि ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला पुढे येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून आघाडीत मतभेद असल्याचे चित्र सध्यातरी आहे. सर्व निर्णय एकत्र बसून करू असे तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी ठरविले आहे.
प्रचाराचा नारळ कधी?
महाविकास आघाडीची पहिली संयुक्त सभा १६ ऑगस्टला मुंबईत होईल. काँग्रेसचे नेते १० ऑगस्टपासून मराठवाड्याच्या दाैऱ्यावर असतील. राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी २० ऑगस्टला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत सभा होईल. प्रचाराचा नारळ या निमित्ताने फोडला जाईल.