गाठीभेटी, मोर्चेबांधणी सुरू;  इच्छुकांची पळवापळवी अटळ!विधानसभेला अपक्षांची संख्या वाढणार 

By यदू जोशी | Published: August 10, 2024 01:17 PM2024-08-10T13:17:29+5:302024-08-10T13:17:54+5:30

बदललेल्या समीकरणात आपण आहोत त्या पक्षाकडून उमेदवारी मिळणे कठीण आहे हे लक्षात आल्याने इच्छुकांनी गुप्त भेटीगाठी सुरू केल्या आहेत. 

Gathibheti, formation of the front started;  Aspirants are inevitable! The number of independents will increase in the Legislative Assembly  | गाठीभेटी, मोर्चेबांधणी सुरू;  इच्छुकांची पळवापळवी अटळ!विधानसभेला अपक्षांची संख्या वाढणार 

गाठीभेटी, मोर्चेबांधणी सुरू;  इच्छुकांची पळवापळवी अटळ!विधानसभेला अपक्षांची संख्या वाढणार 


यदु जोशी -

मुंबई : विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीत एकमेकांचे मित्र असलेेले पक्ष आता आगामी विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार असल्याने इच्छुकांची पळवापळवी अटळ आहे. गेल्या काही दिवसांत त्या दृष्टीने विविध पक्षांच्या मोठ्या नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. बदललेल्या समीकरणात आपण आहोत त्या पक्षाकडून उमेदवारी मिळणे कठीण आहे हे लक्षात आल्याने इच्छुकांनी गुप्त भेटीगाठी सुरू केल्या आहेत. 

 महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हींना या पळवापळवीचा फटका बसेल असे चित्र आहे. तसेच इच्छुकांच्या गर्दीमुळे बंडखोरी मोठ्या प्रमाणात होईल आणि अपक्षही १९९५ प्रमाणे जास्त संख्येने निवडून येतील असे म्हटले जात आहे. १९९५ मध्ये ४५ अपक्ष आमदार निवडून गेले होते. त्यापैकी बहुतेक सगळ्यांनी तत्कालीन भाजप-शिवसेना युती सरकारला पाठिंबा दिला होता आणि काही मंत्रिपदेदेखील मिळविली होती. 

आता सगळीच गणिते बदलली
- २०१९ मध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती, तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असा मुकाबला झाला होता. 
- युतीला निर्भेळ बहुमत मिळूनदेखील चमत्कार झाला आणि काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना असे सरकार बनले व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. २०२२ मध्ये शिवसेना फुटली आणि भाजपसोबत सरकार स्थापन करीत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.
- २०२३ मध्ये राष्ट्रवादी फुटली आणि अजित पवार महायुतीत सहभागी झाले. त्यामुळे आता सगळीच गणिते बदलली आहेत. 

आमदारांबाबत ‘सिटिंग-गेटिंग’ ठरला फॉर्म्युला 
शिंदे यांचे समर्थक असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजप गेल्यावेळी लढलेला नाही, मात्र आता तिथे भाजपकडून काहीजण इच्छुक आहेत. आमदारांबाबत ‘सिटिंग-गेटिंग’असा फॉर्म्युला ठरला, तर महायुतीत जो मतदारसंघ आज ज्याच्याकडे आहे त्याच पक्षाला उमेदवारी मिळेल. मात्र, अन्य ठिकाणी तिन्ही पक्षांमध्ये उमेदवारीसाठी ओढाताण होईल. ‘सिटिंग-गेटिंग’ फॉर्म्युल्याला त्या मतदारसंघाच्या आमदारांशिवाय इतर इच्छुकांचा मात्र विरोध आहे. या विरोधातूनही बंडखोरी होईल. युती आणि आघाडी असे दोन्हीकडे हे होऊ शकते. त्यामुळे बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान दोघांसमोरही असेल, सत्तेत असल्याने ते महायुतीसमोर अधिक कडवे असेल. 

इच्छुक जाऊ शकतात राज ठाकरेंच्या दारात
अजित पवार गटातील काही आमदार हे शरद पवार यांच्या संपर्कात आहेत. महाविकास आघाडीत आपल्याला उमेदवारी मिळणे कठीण असल्याचे लक्षात आल्याने काही इच्छुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत. 
शिंदेसेना वा अजित पवार गटाला जागा सुटण्याची पूर्ण शक्यता असलेल्या मतदारसंघात भाजपचे काही तगडे इच्छुक बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत.
उद्धव सेनेसोबत १५ आमदार असले तरी ते किमान १०० जागांवर दावा करतील. तेथील काँग्रेस व शरद पवार गटाचे इच्छुक महायुतीच्या गळाला लागू शकतात. 

आपल्यासोबत असलेल्या अपक्ष आमदारांसाठी युती वा आघाडीने जागा सोडल्या तरी त्या मतदारसंघांमध्ये पाठिंबा दिलेल्या पक्षांचेच इच्छुक मोठ्या प्रमाणात बंडखोरी करतील असे म्हटले जाते. काही इच्छुक राज ठाकरेंच्या दारात जाऊ शकतात. लोकसभेला पराभूत झालेले एक भाजपचे खासदार बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत.
 

Web Title: Gathibheti, formation of the front started;  Aspirants are inevitable! The number of independents will increase in the Legislative Assembly 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.