समतेची शिकवण देणारी सोलापूरची गड्डायात्रा
By admin | Published: January 15, 2016 04:48 AM2016-01-15T04:48:19+5:302016-01-15T04:48:19+5:30
सोलापूरची गड्डा यात्रा म्हणून सर्वपरिचित असणारी व पाच दिवसांचे भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन येणारी मकरसंक्रांत सोलापूर पंचक्रोशीसह शेजारच्या कर्नाटक
सोलापूरची गड्डा यात्रा म्हणून सर्वपरिचित असणारी व पाच दिवसांचे भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन येणारी मकरसंक्रांत सोलापूर पंचक्रोशीसह शेजारच्या कर्नाटक व आंध्रप्रदेशातील सीमावर्ती भागातही स्वतंत्र ओळख ठेवून आहे़
सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिध्दरामेश्वर हे योगीकुलचक्रवर्ती या उपाधीने ओळखले जाणारे एकमेव संत़ सिध्देश्वर, सिध्दरामेश्वर अशा दोन्ही नावांनी ओळखले जाणारे सिध्देश्वर कृषक कुळातील लोकपुरूष आहेत़ ते कन्नड भाषेतील संवेदनशील कवी (वचनकार)होते़ त्यांनी व्यापक समाजहिताचा ध्यास घेत अनेक लोकोपयोगी कामे केली़श्रमाधिष्ठित समाज रचना हा त्यांच्या विचारांचा पाया होता़ त्यांनी अनेक धरणे, तळी बांधल्याचा उल्लेख त्यांच्या व समकालीन संतांच्या वचनात सापडतो़ स्वत: सिध्देश्वरांनी ६८ हजार वचन लिहिल्याचा उल्लेख त्यांच्याच वचनात आढळतो़
सिध्देश्वरांनी सोलापूरच्या पंचक्रोशीत ६८ लिंंगांची स्थापना केली़ त्याचबरोबर अष्टविनायक यांचीही स्थापना केल्याचा उल्लेख कवी राघवांक यांनी लिहिलेल्या सिध्दराम चरित्रात आहे़ ६८ लिंग व अष्टविनायकांच्या स्थापनेबाबतच्या अनेक कथा, उपकथा आणि आख्यायिका सांगितल्या जातात़
सर्व समाजघटकाची यात्रा
गड्डा यात्रेत माळी, विश्व ब्राम्हण, सुतार, मातंग आणि दलित समाजाचे नंदीध्वज सहभागी होतात. म्हणजेच यात्रा ही केवळ एका समाजाची नव्हे तर सर्वच समाजघटकांना मान्यता व संधी देणारी आहे. ज्या काळात जातीभेद उच्च कोेटीला जाऊन पोहचलेले होते. त्याकाळात सिद्धरामेश्वरांनी सर्वच समाज आणि जातींना एकच स्थान दिलेले आहे. बसव प्रणित कल्याण क्रांतीच्या पाऊलखुणा या यात्रेत आजही पहायला मिळतात.आठशे वर्षापुर्वी सिद्धेश्वरांनी दिलेली शिकवण सोलापूरातील सर्वच समाजबांधव आजही कायम ठेवून आहेत आणि त्याच पद्धतीने प्रत्येक जातीला सोबत घेऊन ही यात्रा साजरी केली जाते.
यात्रेतील ७ नंदीध्वज
सिध्देश्वर यात्रेत विविध जातीचे सात नंदीध्वज सहभागी होतात़ त्यामुळे खऱ्या अर्थाने ही सर्वसमावेशक असल्याचे दिसून येते़ यात्रेत बारा बलुतेदार, अठरापगड समाजघटकांना मान असल्याचे दिसते़ हलगी, संबळ,वाजंत्रीवाले यांच्यासह प्रत्येक समाजघटकाला यात्रेत मानाचा विडा आहे़म्हणूनच ही यात्रा केवळ एका समाजाची किंवा जातीची न राहता संपूर्ण सोलापूरची राहिली आहे़
यात्रेचा पोशाख खास़़बाराबंदी
पांढरेशुभ्र धोतर, फेटा , अंगात शर्ट आणि त्यावर बाराबंदी असा यात्राकाळातील पोशाख लक्ष वेधून घेतो़नंदीध्वज मिरवणुकीत सहभागी होणाऱ्यांसाठी हा पोशाख पावित्र्याचा तितकाच प्रतिष्ठेचाही मानला जातो़ हा ड्रेसकोडच मानला जातो़ आजच्या पोशाखातून हद्दपार झालेली ‘बाराबंदी’ गड्डा यात्रेत पाहण्यास मिळते़
यात्रेचे कार्यक्रम
ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेस बुधवारी ‘यण्णीमज्जने’ तैलाभिषेकापासून प्रारंभ झाला़ सिद्धरामेश्वरांच्या पंचक्रोशीत स्थापन केलेल्या ६८ लिंगांना तैलाभिषेक करण्यात आले़ गुरुवारी (१४ जानेवारी) संमती कट्ट्यावर अक्षता सोहळा, १५ रोजी होम मैदानावर होम प्रदीपन सोहळा तर १६ जानेवारी रोजी रात्री शोभेचे दारुकाम आणि १७ जानेवारी रोजी कप्पडकळी (नंदीध्वजाचे वस्त्र विसर्जन समारंभ)या विधीने यात्रेची सांगता होणार आहे़
गड्डा यात्रेच्या परंपरेनुसार दरवर्षी याच तारखांना यात्रा होते़मात्र अधिक मास असल्यास यात्रा १२ जानेवारी ऐवजी १३ जानेवारीला सुरू होते़
सिध्देश्वरांचे चरित्र आणि आख्यायिका
श्री सिध्दरामेश्वरांच्या कार्यकाळाविषयी मतभेद असले तरी बाराव्या शतकाच्या प्रारंभी त्यांचा जन्म झाल्याचे सर्वमान्य आहे़धारवाड विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या सिध्दराम शिवयोगी या ग्रंथात त्यांचा कार्यकाळ ११३० ते ११८० असे मानण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे़ मुर्डी मुद्दगौडा आणि सुग्गव्वा(सुगलादेवी) या शिवोपासक वृध्द दांपत्याच्या पोटी सिध्दरामेश्वरांचा जन्म झाला़ शिवयोगी जगद्गुरू रेवणसिध्देश्वरांनी या दांपत्याला अनुग्रह करताना सोन्नलगीचा (सोलापूर) भूकैलास घडविणारा तेजस्वी योगीपुरूष जन्माला येणार असल्याचे सांगितले़ धुळीमहांकाळ (बाळ सिध्देश्वर)वयाच्या दहाव्या वर्षांपर्यंत अबोल स्वभावाचा होता़ गुरे राखताना तो कुणाशी बोलत नसे़ गुरामागे रानात एकदा तेजस्वी जंगममूर्तींनी(मल्लय्या/ मल्लिकार्जुन) सिध्देश्वराला भेट देत दहिभाताची मागणी केली़ बालक सिध्देश्वर घरून दहिभात घेऊन परत येईपर्यंत मल्लय्या दिसेनासे झाले होते़त्यांचा माग घेत सिध्देश्वर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या आंध्रप्रदेशातील श्रीशैलला पोहोचले़ मात्र तेथेही मल्लय्या न भेटल्याने शेवटी दरीत उडी घेताना त्याच्या उत्कट भक्तीला प्रसन्न होऊन मल्लय्याने त्याला अलगद उचलून घेतले़आणि आशीर्वाद देऊन सोन्नलगी येथे समाजकार्य करण्याचा संदेश दिला़ अशी कथा प्रचलित आहे़
सिध्देश्वरांचे वचन साहित्य
६८ हजार वचने गायल्याचा उल्लेख सिद्धेश्वरांच्या वचनात आहे. जन्मात:च सिद्ध असलेल्या या योगी पुरूषाच्या भाव जीवनातील सर्व छटांचे दर्शन उपलब्ध सुमारे दोन हजार वचनांतून होते. सर्वच भारतीय संताच्या साहित्यामागे अध्यात्माची, कर्मयोगाची आणि आत्मपरिक्षणाची एक विशाल सर्व स्पर्शी पार्श्वभूमी असून या साहित्याचा केंद्रबिंदू मानव आणि मानवीयता हाच आहे. त्यामुळेच भिन्न भाषा, भिन्न प्रांत आणि भिन्न काळातील संताचे विचार आपल्याला सारखेच वाटतात. कारण कोण कोणाचे अनुकरण करत नसले तरी त्यांच्या विचारांची आणि जगण्याची बैठक एकच असल्याचे पदोपदी जाणवते.
सिद्धेश्वरांची वचने वाचतांना त्यांच्या अंतरंगातील करूणेचा त्यांच्या मानवता प्रेमाचा, भूत दयेचा, श्रमाधिष्ठीत समाजनिर्मि तीचा ध्यास, उत्क ट भक्ती प्रत्यय येतो. आपल्या मनाला उपदेश करतांना सामाजिक दंभावरही ते तुटून पडतात.
तलावातील मंदिऱ़
भोवताली तलावाचे पाणी आणि मधोमध भव्य मंदिर अशी विलोभनीय रचना सोलापुरातील सिध्दरामेश्वरांच्या मंदिराची आहे़ म्हणजे तलावातील बेटावर हे मंदिर वसले आहे़ या मंदिरात सिध्देश्वरांची योग समाधी आहे़ तलावाभोवती (दोन बाजूंनी) किल्ल्याची तटबंदी आहे़ हा तलाव बांधताना सप्तसिंधूंनी आशीर्वाद सिध्देश्वरांना दिल्याची आख्यायिका आहे़
संस्कार भारतीची रांगोळी
५ वर्षांच्या बालकांपासून ते ८० वर्षांच्या वृद्धापर्यंत सारेचजण तीन कि़मी़च्या रस्त्यावर पहाटेपासून रांगोळ्याच्या पायघड्यात मग्ऩ़़१५ वर्षांपासून प्रबोधनाचा संदेश़़़ प्रत्येक वर्षी वेगळी थीम़ गेल्या वर्षी ‘जल है तो कल है’ हा संदेश होता़ यंदाचा संदेश आता रांगोळीतूनच दिला जाणार आहे ़ हा उपक्रम संस्कार भारतीच्या वतीने राबविला जातो़ मल्लिकार्जुन मंदिर ते सम्मतीकट्टा अशा तीन कि़मी़च्या अंतरावर रांगोळ्यातून सुंदर पायघड्यांनी सिध्दरामेश्वरांच्या सात काठ्यांचे स्वागत होते़