‘गौराई माझी लाडाची लाडाची गऽऽ...' आज दिवसभर केव्हाही आणाव्यात गौरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 02:09 AM2017-08-29T02:09:28+5:302017-08-29T02:10:06+5:30

आज भाद्र्रपद शुक्ल अष्टमी, मंगळवार, चंद्र रात्री १० वाजून ५५ मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्रात आहे. त्यामुळे आजच ‘ज्येष्ठा गौरी आवाहन’ आहे. आज दिवसभर केव्हाही गौरी आणाव्यात. वेळ उत्तम आहे.

'Gaurai is my laddacha cahal ... ...' Gauri has to bring it all day today | ‘गौराई माझी लाडाची लाडाची गऽऽ...' आज दिवसभर केव्हाही आणाव्यात गौरी

‘गौराई माझी लाडाची लाडाची गऽऽ...' आज दिवसभर केव्हाही आणाव्यात गौरी

googlenewsNext

‘गौराई माझी लाडाची लाडाची गऽऽ...
अप्सरा जशी इंद्राची इंद्राची गऽऽ...’
आज भाद्र्रपद शुक्ल अष्टमी, मंगळवार, चंद्र रात्री १० वाजून ५५ मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्रात आहे. त्यामुळे आजच ‘ज्येष्ठा गौरी आवाहन’ आहे. आज दिवसभर केव्हाही गौरी आणाव्यात. वेळ उत्तम आहे. भाद्र्रपद शुक्ल पक्षात चंद्र्र अनुराधा नक्षत्रात असताना ज्येष्ठा गौरी आणाव्यात. चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असताना ज्येष्ठा गौरी पूजाव्यात आणि चंद्र मूळ नक्षत्रात असताना ज्येष्ठा गौरींचे विसर्जन करावे असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबात वेगवेगळ्या परंपरेप्रमाणे गौराईचे आगमन होत असते. गौराईच्या आगमनाबरोबर त्या कुटुंबातील सासरी गेलेली कन्याही आपल्या मुलाबाळांसह माहेरी माहेरपणाचा आनंद घेण्यासाठी येत असते. गौराईच्या स्वागताबरोबरच त्या कुटुंबातील माता आपल्या लेकीचे स्वागत करण्यासाठी आतुर झालेली असते. आपल्याकडे पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती. त्या वेळी मुलींना सासर आणि माहेर यांत खूप फरक जाणवत होता. सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीत राहणाºया मुलींना त्या वेळच्या या माता आणि माहेरी आलेल्या कन्येच्या भेटीबद्दल व त्यांच्या संवादाबद्दल काही विशेष वाटणार नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या ‘राजा-राणी’च्या कुटुंबात राहणाºया मुलींना माहेर आणि सासर यांत फरकच जाणवत नाही. त्या वेळी दूरध्वनी किंवा मोबाइल नव्हते. आई-मुलीची प्रत्यक्ष भेट गौराईच्या या सणाच्या निमित्ताने होत होती. म्हणून पूर्वी या दोन्ही गौरार्इंच्या आगमनाला - गौरी आवाहनाला एक विशेष असे महत्त्व होते.
आई-वडिलांची सेवा
कधी कधी पुराणातली ही ‘वानगी’ मोठा संदेश देत असतात. आता हेच पाहाना!
पद्मपुराणातील ही कथा तशी साधी सरळ आहे. एकसष्टाव्या अध्यायातील ही कथा महर्षी व्यासांनी संजयाला सांगितलेली आहे. शंकर - पार्वती यांना स्कंद आणि गणेश अशी मुले होती. एके दिवशी सर्व देवांनी श्रद्धेने अमृतापासून तयार केलेला एक दिव्य मोदक पार्वतीला दिला. तो पाहून पार्वतीची दोन्ही मुले त्या मोदकासाठी माता पार्वतीकडे हट्ट करू लागली. तेव्हा पार्वती त्या दोन्ही मुलांना म्हणाली, ‘‘हा अमृताचा मोदक खूप महत्त्वाचा आहे. हा मोदक खाणारा अमर होऊन सर्व विद्या, शास्त्र, कला यांमध्ये निपुण होईल. परंतु हा मी तुमच्यापैकी एकालाच देणार आहे. जो धार्मिक भावनेने सिद्धी प्राप्त करून प्रथम माझ्यापाशी येईल त्यालाच मी हा मोदक देणार आहे.’’ हे ऐकून स्कंद मोरावर विराजमान होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी निघाला. गणेशाने मात्र आई-वडिलांची पूजा केली आणि त्यांना नमस्कार करून प्रदक्षिणा घातली. स्कंद येण्यापूर्वीच तो पार्वतीपुढे हजर झाला. तीर्थयात्रा आटोपून स्कंद आपल्यालाच मोदक मिळणार या आशेने पार्वतीपाशी आला. तेथे गणेशाला पाहून तो चकित झाला. मग दोघेही मोदकासाठी पार्वतीकडे हट्ट करू लागले. पार्वतीने गणेशाला शाबासकी दिली. तिने त्याच्या बुद्धीचातुर्याचे कौतुक केले आणि म्हणाली, ‘‘आई-वडिलांच्या पूजेचे (सेवेचे) पुण्य व सिद्धी ही इतर कुठल्याही सिद्धीपेक्षा महान व श्रेष्ठ आहे. त्यामुळे मी हा मोदक गणेशालाच देणार आहे.’’
मोदक देताना शंकर - पार्वतीनी गणेशास वर दिला की, ‘‘तुला यज्ञयागात, वेदशास्त्र स्तवनात, नित्यपूजा विधानात अग्रक्रम मिळेल.’’
अमृताचा मोदक मिळवणारा, आई-वडिलांची सेवा करणारा, अग्रपूजेचा मान मिळविणारा गणेश हा लहानांपासून थोरांपर्यंत, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच प्रिय व जवळचा वाटू लागला.
सध्या काही मुले आपल्या वृद्ध माता-पित्याचा नीट सांभाळ करीत नाहीत. त्यांना वृद्धाश्रमात धाडतात. अशा मुलांसाठी ही कथा खूप मार्गदर्शक ठरेल. आपणास जन्म देणारे, लालन पालन करून शिक्षण देणारे व लहानाचे मोठे करणारे, आपणास खूप जपणारे, सदैव आपल्या पाठीशी उभे राहून आपले शुभचिंतन करणारे आपले माता-पिता हे मुलांना देवासमान आदरणीय वाटले पाहिजेत.

Web Title: 'Gaurai is my laddacha cahal ... ...' Gauri has to bring it all day today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.