गौराईचा पाहुणचारही झाला थाटात

By admin | Published: September 21, 2015 03:39 AM2015-09-21T03:39:25+5:302015-09-21T14:42:47+5:30

गणराजाबरोबरच सोनपावलांनी आलेल्या गौराईचे स्वागतही ठाण्यासह पालघर जिल्ह्यातील सवाष्णींनी तितक्याच मोठ्या थाटात केले.

Gaurai's hospitality also happened | गौराईचा पाहुणचारही झाला थाटात

गौराईचा पाहुणचारही झाला थाटात

Next

भाग्यश्री प्रधान, ठाणे
गणराजाबरोबरच सोनपावलांनी आलेल्या गौराईचे स्वागतही ठाण्यासह पालघर जिल्ह्यातील सवाष्णींनी तितक्याच मोठ्या थाटात केले. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या लाडक्या गौराईला जेवू घालण्यासाठी गौरीभक्त धडपडत होते. पालेभाजी व भाकरी तसेच विविध ५६ पदार्थांचा नैवेद्य या वेळी गौरीला दाखवण्यात आला.
पुरणपोळी, रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू, साटोरी, अनारसे, तांदळाची खीर, गव्हाची खीर, घावने, पुरीभाजी या पदार्थांची घराघरांत रेलचेल होती. आपल्या घरात आलेल्या या माहेरवाशिणीला खूश करण्यासाठी आणि लक्ष्मी, सरस्वती या रूपाने तिचा आशीर्वाद सतत घरामध्ये राहावा, यासाठी तिचे मनोभावे पूजन करण्यात आले. त्यानंतर, घराघरांत संध्याकाळी हळदीकुंकवाचा व पारंपरिक पद्धतीचे खेळ व गाणी गाऊन जागरणाचा कार्यक्रमही संपन्न झाला. काही घरांमध्ये गौरीबरोबर शंकराचेही पूजन करण्यात आले.
गौरीचा साजशृंगार व मनोभावे केलेल्या पूजेमुळे घराघरांत तेजोमय वातावरण होते. काही घरांमध्ये तर धान्याच्या राशीवर आपल्या गौराईला बसविण्यात आले. अशा गौरी बसवण्याचा मूळ हेतू घरात सतत धान्याचा पुरवठा होत राहो, असा आहे. सवाष्णींना व माहेरवाशिणींना जेवू घालण्याची पद्धत असल्याने अनेकांकडे माहेरवाशिणींना घरी बोलवण्यात आले होते. तेरड्याची, खड्याची, मुखवट्यांची, उभी, बसलेली असे गौरीचे अनेक प्रकार महाराष्ट्रात पाहावयास मिळतात. तिची रूपेही अनेक असल्याने काही जण गणपतीची बहीण, तर काही गणपतीची आई, लक्ष्मी, असे वेगवेगळ्या रूपांत तिचे पूजन करतात. सोमवारी मात्र या लाडक्या गौरीचे विसर्जन करण्यात येणार
असून तिला पुढल्या वर्षीही अशीच लवकर सोनपावलांनी ये, असे सांगण्यात येणार आहे.

Web Title: Gaurai's hospitality also happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.