मारुती चितमपल्ली, यास्मिन शेख यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2017 01:46 AM2017-01-04T01:46:29+5:302017-01-04T01:46:29+5:30

राज्य सरकारच्या मराठी विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, या वर्षी ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांना विंदा करंदीकर

Gaurav of Maruti Chitampally, Yasmin Sheikh | मारुती चितमपल्ली, यास्मिन शेख यांचा गौरव

मारुती चितमपल्ली, यास्मिन शेख यांचा गौरव

Next

मुंबई : राज्य सरकारच्या मराठी विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, या वर्षी ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार भारतीय विचार साधना प्रकाशनास, तर मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार श्याम जोशी यांना व डॉ. अशोक केळकर भाषाअभ्यासक पुरस्कार ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ श्रीमती यास्मिन शेख यांना जाहीर करण्यात आला आहे. मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिली.
उत्कृष्ट प्रकाशन पुरस्काराचा मान मिळालेल्या भारतीय विचार साधना प्रकाशनाने आजवर ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर प्रामुख्याने राष्ट्रभक्ती व राष्ट्रपुरुष आणि समाजसेवा विषयांवर ग्रंथनिर्मिती केली आहे. तर वन्यजीवन हे क्षेत्र मराठीत समृद्ध करणाऱ्याचे काम अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी केले आहे. सुमारे अडीच लाखांच्या ग्रंथसंपदेचा संग्रह करून, हजारो लोकांपर्यंत मराठी साहित्याचे विविध प्रकार पोहोचविण्याचे काम करणारे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील ग्रंथसखा वाचनालयाचे संस्थापक श्याम जोशी यांचा मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. व्याकरण तज्ज्ञ श्रीमती यास्मिन शेख यांच्या कार्याचा या वर्षी गौरव होत आहे. येत्या मराठी भाषा गौरव दिनी म्हणजेच, २७ फेब्रुवारी, २०१७ रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, असे तावडे यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)

हा तर भाषेचा गौरव : ‘‘मराठी भाषा संवर्धनासाठी बदलापुरात स्वायत्त विद्यापीठ उभारण्यात आले. माझ्या या कार्याची दखल राज्य सरकारने घेतली, याचा मला आनंद आहे. हा पुरस्कार म्हणजे भाषेविषयी मला असलेल्या गोडीचा गौरव आहे आणि हा गौरव केवळ माझा नसून मराठी भाषेचा आहे.’’ अशी प्रतिक्रिया शाम जोशी यांनी व्यक्त केली.

Web Title: Gaurav of Maruti Chitampally, Yasmin Sheikh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.