मुंबईतील वर्सोवा चौपाटी स्वच्छता मोहिमेचा अमेरिकेच्या पर्यावरण प्रमुखांकडून गौरव
By admin | Published: October 4, 2016 05:59 PM2016-10-04T17:59:34+5:302016-10-04T17:59:34+5:30
मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, मार्वे आणि गोराई या मुंबईची शान असलेल्या प्रमुख ६ चौपाट्या जणू कचराकुंड्या झाल्या
अमेरिकेचे पर्यावरण प्रमुख इरिक सोहिलीम हे खास गांधी जयंती निमित्त अंधेरी(प) येथील वर्सोवा बीचवर खास उपस्थित राहून त्यांनी गेल्या रविवारच्या पावसात सुमारे १००० नागरिकांच्या उपस्थितीत या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. व्हीआरव्ही आणि येथील कोळी बांधवांनी कोणत्याही राजकीय पक्षाला सहभागी न करता उस्फूर्तपणे आणि नि:स्वार्थी वृतीने घालून दिलेला हा स्वच्छतेची मोहिम भारत, अमेरिका आणि जगासाठी एक नवा आदर्श ठरेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. या मोहिमेत अभिनेत्री पूजा भट, अमेरिकेचे काउन्सील जनरल थाँमस वाजीडा, त्यांचे सहकारी जेनिफिर लार्सन, इंडियन आयडॉल विजेता मियांग चांग, व्हीआरव्हीचे अँड.आफ्रोज शाहा, नरेश सुरी, अमित सुरवसे, नरेश केसवानी, वेसावा कोळीवाड्याचे राजहंस टपके, डॉ.चारूल भानजी, प्रवीण भावे, डॉ.गजेंद्र भानजी, मोहित रामले, विश्वास खर्डे यांच्यासह १० महाविद्यालयांचे विद्यार्थी सह्भागी झाले होते.
श्री.इरिक सोहिलीम म्हणाले की, ज्यांनी सर्व जगाला अंहिसेची शिकवण दिली त्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मदिनी आपण सर्व या मोहिमेत सहभागी झाल्याबद्धल मला मानापासून आनंद झाला असून जगातील सर्वात मोठी बीच स्वच्छता मोहिम असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. अँड.आफ्रोज शाहा यांनी आपल्या खिडकीतून दिसणाऱ्या या बकाल वर्सोवा बीचचा चेहरामोहरा बदलण्याचे स्वप्न बघितले होते. त्यांच्या आणि कै.हरीबंश माथूर यांनी गेल्या १ वर्षापूर्वी २ ऑक्टोबर २०१५ साली सुरु केलेल्या वर्सोवा बीचची स्वच्छता मोहिमेला गती आली असून आज लहान ६ वर्षाच्या चिमुरड्यासह ८०वर्षीय जेष्ठ नागरिक या मोहिमेत सहभागी झाल्याबद्धल त्यांनी कौतुक केले. भविष्यात तरुण-तरुणी, जेष्ठ नागरिक या ठिकाणी चकाचक झालेल्या वर्सोवा बीचवर येऊन बीचवरील शुभ्र वाळूत सूर्योदय आणि सूर्यास्ताचा आनंद लुटतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या मोहिमेत त्यांना वर्सोवा बीच मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या आढळून आल्या. माशांच्या आणि समुद्र पक्षांच्या पोटात प्लास्टिक जाते आणि तेच मासे आपण खातो यावर चिंता व्यक्त केली.राज्य आणि केंद्र सरकारने प्रत्येक बीचवर प्लास्टिकवर प्रक्रिया करणारे प्लास्टिक वेंडिंग मशीन उपलब्ध करून दिले पाहिजे.डंपिंग ग्राउंडवरील प्लास्टिकचे विघटन केल्यास नवे उद्योगधंदे उभारून रोजगार उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.राज्य सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या वाढत्या प्लास्टिकला आळा घालून प्लास्टिकवर प्रक्रिया कशी करता येईल याकडे जातीने लक्ष दिले पाहिजे.आजच्या या एतिहासिक स्वच्छता मोहिमेचा आगळा वेगळा संदेश पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यंत पोहचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सोशल मिडीयावरून व्हायरल झालेल्या वर्सोव्यातील रहिवाशांच्या व स्थानिक कोळी समाजाच्या चौपाटी स्वच्छतेच्या मोहिमेची दखल थेट संयुक्त राष्ट्रांच्या लेव्हीस पग या प्रतिनिधींनी घेतली आहे.श्रमदानातून यशस्वी होत असलेल्या वर्सोवा चौपाटीच्या स्वच्छतेच्या पॅटर्नचा अभ्यास करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या अकरा प्रतिनिधिनी गेल्या ५ आणि ६ ऑगस्टला वर्सोवा चौपाटीला भेट देऊन या मोहिमेत भाग सुद्धा घेतला होता अशी माहिती अँड.आफ्रोज यांनी दिली.
वर्सोवा रेसिडेन्ट व्हॉलेंटियर्सच्या (व्हीआरव्ही) व वेसावे कोळी जमात रिलीजस आणि चँरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेली ५२ आठवडे दर शनिवार आणि रविवारी सकाळी १० ते १२ यावेळेत सुमारे २०० ते २५० कार्यकर्ते वर्सोवा चौपाटीची स्वच्छता करतात. व्हीआरव्हीचे अँड.आफ्रोज शाह,अभिनेते श्री.संजय सुरी,मोना केसवानी,अँड.अमित सुरवसे,खास बोरिवली वरून दर शनिवार आणि रविवारी या मोहिमेत सहभागी होणारे ज्येष्ठ नागरिक योगेश दीक्षित या प्रमुख कार्यकर्त्यांचा या मोहिमेत सातत्याने पुढाकार असतो.वर्सोव्याचे प्रवीण भावे,राजहंस टपके, डॉ.चारूल भानजी,पंकज भावे,डॉ.गजेंद्र भानजी,मोहित रामले यांचे या या मोहिलेला सहकार्य असून वेसावे कोळीवाड्यासह इतर कोळीवाड्यातील महिला मंडळसुद्धा या मोहिमेत सहभागी होण्यास उत्सुक्त असल्याची माहिती व्हीआरव्हीच्या सदस्यांनी दिली.
विशेष म्हणजे गेल्या रविवारी पाऊस असतांना देखिल या संस्थेच्या १३०० कार्यकर्त्यांनी येथील चौपाटीची स्वच्छता करून ४००० किलो प्लास्टिक,कचरा आणि अन्य कचरा गोळा केला.गेल्या वर्षभरात सुमारे ३१लाख किलोच्यावर कचरा आमच्या सदस्यांनी गोळा केला अशी माहिती आँफ्रोज शाह आणि अमित सुरवसे यांनी दिली. पालिका आयुक्त अजोय मेहता,पालिका उपायुक्त किरण आचरेकर आणि के(पश्चिम)विभागाचे सहाय्यक पालिका आयुक्त पराग मसुरकर यांनी देखिल या स्वच्छता मोहिमेला मोलाचे सहकार्य करून पालिकेतर्फे २ जेसीबी,२ ट्रँक्टर,२ वजनकाटे,५ डम्पर्स आणि पालिकेचे ३० कर्मचारी आदी साधन सामुग्री त्यांनी उपलब्ध करून दिली अशी महिती वेसावे कोळी जमात रिलीजस आणि चँरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मनीष भुनगवले आणि सदस्य राजहंस टपके यांनी दिली.आपला वैद्यकीय व्यवसाय साभाळून मढ-वेसावे येथील डॉ.चारूल भानजी सुद्धा आरोग्यासाठी स्वछता कशी महत्वाची आहे याचे महत्व पटवून देत आहेत.विशेष म्हणजे या स्वछता मोहिमेत नॉर्वेच्या काऊसीलेट जनरलने भाग घेऊन या मोहिमेचे कौतूक केले अशी माहिती सिंहगड इस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट संस्थेचा माजी विद्यार्थी मोहित रामले याने दिली.
या स्वच्छता मोहिमेत वाळूत ५ फूट खोल कचऱ्याचा ढिगामध्ये प्लास्टिक,बँग,चादरी,गोण्या,जु
एकेकाळची वेसावकरांची शान असलेली वेसाव्याची खाडी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. शिवाय लोखंडवाला,गोरेगांव,मालाड येथील परिसरात १२-१३गटारे आहेत त्यातील दूषित पाणी,प्लास्टिक पिशव्या आणि रासायनिक कारखान्यातील प्रक्रिया न केलेले पाणी वेसावे खाडीत सोडण्यात येते.त्यामुळे परिणामी येथील वेसावे खाडी कालवंडलेली असून येथील गेली विपरीत परिणाम येथील मासेमारीवर झाला असून यावर शासन आणि पालिकेने आळा घातला पाहिजे असे ठाम मत राजहंस टपके आणि वेसावा नाखवा मंडळ(ट्राँलर्स)चे अध्यक्ष देवेंद काळे आणि माजी अध्यक्ष पृथ्वीराज चंदी यांनी व्यक्त केले..आता समुद्रात मासेमारीची जाळी टाकली.या जाळ्यांमध्ये फक्त कचरा, प्लास्टिक, बिस्किटांच्या व वेफर्सच्या पुड्यांची आवरणेच अडकली. एकही मासा जाळीत अडकला नाही. पूर्वी अर्धा तास मासेमारी केली तरी दोन दिवसांचे मासे मिळत होते अशी माहिती त्यांनी दिली.
- मच्छीमार नेते राजहंस टपके, डॉ.गजेंद्र भानजी आणि प्रवीण भावे यांनी इरिक सोहिलीम यांच्या हातात गेल्या रविवारचा लोकमतचा अंक दिला.त्यावेळी लोकमतविषयी त्यांनी माहिती घेतली आणि या मोहिमेत लोकमत सहभागी झाल्याबद्धल त्यांनी समाधान व्यक्त केले. या ठिकाणी लोकमतच्या छत्र्या उठून दिसत होत्या.