गौरी लंकेश हत्येचे जळगाव कनेक्शन? कोल्हापूर व कर्नाटक गुप्तचर यंत्रणेचे पथक शहरात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 05:13 AM2018-08-14T05:13:54+5:302018-08-14T05:14:07+5:30
कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाचे कनेक्शन जळगाव शहरात असल्याचे तपासात पुढे आले आहे.
जळगाव - कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाचे कनेक्शन जळगाव शहरात असल्याचे तपासात पुढे आले आहे. तपासासाठी कर्नाटक गुप्तचर यंत्रणा व कोल्हापूर पोलिसांची दोन पथके सोमवारी जळगावात दाखल झाली. त्यांनी कोल्हे हिल्स परिसरातील काही घरांची झडती घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
बंगळुरूतील राज राजेश्वर नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ५ सप्टेंबरलाज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळी झाडून हत्या झाली होती. बंगळुरू गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची नावे समजू शकली नाहीत, मात्र कोल्हापूर पोलिसांच्या पथकात अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बावकर यांचा समावेश आहे. पथकाने सकाळी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची भेट घेऊन स्थानिक पोलिसांची मदत मागितली. पथकाने तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक रत्नपारखी यांची भेट घेतली. दोन पोलीस कर्मचारी सोबत घेऊन पथकाने कोल्हे हिल्स परिसर गाठले. तेथे संशयित व्यक्तीच्या घराची झडती घेतली. त्यात काय निष्पन्न झाले, याचा तपशील समजू शकला नाही.
स्थानिक पोलिसांचे मोबाईल ताब्यात
अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी या कारवाईबाबत अतिशय गोपनियता बाळगली. पथक चौकशीसाठी शहरात आल्याची कोणालाच कुणकुण लागणार नाही, याची खबरदारी घेण्यासह त्यांनी तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाºयांना सूचना दिली होती. एवढेच नव्हे सोबत नेलेल्या तालुका पोलिसांचे मोबाईलही ताब्यात घेतले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.