गौराईच्या सोनपावलांनी रूपाली परतली
By admin | Published: September 10, 2016 01:10 AM2016-09-10T01:10:17+5:302016-09-10T01:10:17+5:30
चार महिने घरापासून दूर राहिलेली अपहृत अल्पवयीन मुलगी गौराईच्या सोनपावलांनी आपल्या आईच्या कुशीत गुरुवारी विसावली.
दौंड : विघ्नहर्त्या गणरायाने दौंड तालुक्यातील भोसले कुटुंबियांचे विघ्न दूर केले असून चार महिने घरापासून दूर राहिलेली अपहृत अल्पवयीन मुलगी गौराईच्या सोनपावलांनी आपल्या आईच्या कुशीत गुरुवारी विसावली.
रूपाली राजू भोसले (वय १०) असे त्या मुलीचे नाव आहे. तिचे अपहरण करून तिचा मानसिक छळ केल्याप्रकरणी ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
भुरेवाडी (ता. पाटोदा, जि. बीड) येथील एका शिक्षकाच्या सतर्कतेमुळे आणि रूपालीच्या धाडसामुळे तिची सुटका झाली असल्याची माहिती रेल्वेचे पोलीस निरीक्षक अण्णा गोरे यांनी दिली.
या प्रकरणी श्रीराम आकड्या काळे (वय ६५), छाया श्रीराम काळे (वय ५०), मनीषा श्रीराम काळे (वय ३५, तिघेही रा. भुरेवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) यांना अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, रूपाली राजू भोसले (वय १०, रा. लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) ही मुलगी आई व मावशीबरोबर २४ मे २०१६ रोजी दौंड येथे एका दवाखान्यात जात होते. रेल्वे पूल क्रॉस करताना या मुलीचा हात आपल्या आईच्या हातातून सुटला व ती रेल्वे परिसरात हरवली. या वेळी मुलीचा शोध तिच्या आई आणि मावशीने घेतला; मात्र ती सापडली नाही. रूपाली हरवली असल्याची तक्रार तिची आई ज्योती भोसले हिने दौंड रेल्वे पोलिसांना दिली. दरम्यान, रेल्वे पुलावर मनीषा श्रीराम काळे या महिलेने या मुलीला हेरले व ‘आम्ही तुला तुझ्या आईकडे घेऊन जातो,’ असे सांगून भुरेवाडी येथे नेले. त्यानंतर या मुलीला पाच दिवस घरात कोंडून ठेवण्यात आले होते. तिला मारहाण करून उपाशीदेखील ठेवले.
काही दिवसांनंतर या मुलीला घराच्या बाहेर पाणी आणणे, भांडी घासणे अशी कामे करायला लावली. मात्र, या मुलीवर आरोपींची सातत्याने करडी नजर होती. ‘तू जर कुणाशी काही बोललीस तर बघ,’ असेही तिला धमकावण्यात येत होते.
पाटेदा येथे जाऊन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, रूपालीलादेखील दौंड येथे आणण्यात आले. परिणामी, तिच्या आईकडे तिला सोपविण्यात आले. (वार्ताहर)
>एका शाळेत गेली : अन् शिक्षकाच्या मदतीने केली तिने सुटका
तब्बल ४ महिन्यांनंतर या मुलीने आरोपींची नजर चुकवून पलायन केले व ती तेथील एका शाळेत पोहोचली. एका शिक्षकाला तिच्यावर झालेल्या अन्यायाची माहिती रूपालीने दिली.
या शिक्षकाने तातडीने पाटोदा पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. या वेळी पोलिसांनी रूपालीसह वरील आरोपींना पोलीस ठाण्यात आणले, तेव्हा ‘रूपाली तू कुठे राहतेस?’ असे विचारल्यानंतर ‘दौंड’ असे तिने सांगितले.
त्यानंतर पाटोदा पोलिसांनी दौंड शहर पोलीस ठाण्याला फोन करून विचारणा केली, की रूपाली नावाची मुलगी हरवल्याची आपल्याकडे तक्रार आहे का? त्यांनी नाही सांगितले. त्यानंतर रेल्वे पोलीस ठाण्याला विचारणा केल्यावर या पोलीस ठाण्यात मुलगी हरविल्याची तक्रार होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अण्णा गोरे, पोलीस नाईक संजय सरोदे, श्रद्धा नाईक, प्रशांत नेवारे हे पोलीस पथक पाटोदा येथे जाऊन आरोपींना ताब्यात घेतले.
>अपहरण कशासाठी?
आरोपींनी रूपालीचे अपहरण कशासाठी केले होते, याचा उलगडा अद्याप झालेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, या अपहरणाची सविस्तर माहिती येत्या एक ते दोन दिवसांत पोलिसांच्या हाती लागेल, असे पोलीस वर्तुळात बोलले
जात आहे.