गौरींचे पारंपरिक पद्धतीने आगमन
By admin | Published: September 9, 2016 02:00 AM2016-09-09T02:00:36+5:302016-09-09T02:00:36+5:30
गौराई आली, सोना-मोत्यांची पावलांनी आली, सुखसमृद्धी घेऊन आली,’ असे म्हणत वाजत-गाजत अत्यंत पारंपरिक पद्धतीने गुरुवारी घरोघरी गौरींचे आगमन झाले.
पुणे : ‘गौराई आली, सोना-मोत्यांची पावलांनी आली, सुखसमृद्धी घेऊन आली,’ असे म्हणत वाजत-गाजत अत्यंत पारंपरिक पद्धतीने गुरुवारी घरोघरी गौरींचे आगमन झाले. मुखवट्यांसह उभ्या आणि खड्याच्या गौरी विविध सजावटींसह घरात विराजमान झाल्या. दिवसभर गौरींच्या आगमनासाठीचा शुभ मुहूर्त असल्याने नोकरदार महिलांना चांगलाच दिलासा मिळाला. सायंकाळनंतर गौरी बसविण्याला महिलांनी प्राधान्य दिल्याचे दिसून आले.
दर वर्षी घरी गणपतीचे आगमन झाल्यानंतर पाचव्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे स्वागत केले जाते. अनुराधा नक्षत्रावर पूजन, तर मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते. काही घरांत गौरींनाच महालक्ष्मी असे म्हटले जाते. ज्येष्ठ नक्षत्रावर ही पूजा होते म्हणून त्याला ‘ज्येष्ठ गौरी’ असेही म्हणतात. महालक्ष्मी आणि गौरी किंवा ज्येष्ठा-कनिष्ठा, सखी-पार्वती अशा जोडीने त्या घरात आणल्या जातात. खड्याच्या गौरी, मुखवट्याच्या गौरी (शाडू, माती तसेच पितळी मुखवटे), तेरड्याच्या गौरी मोठ्या सजावटीसह घरोघरी बसवितात.
काही घरांत नवसाने बोललेले गौरींचे बाळदेखील मांडतात. पावलांच्या रांगोळ्या, हळदी-कुंकवाच्या सड्यावरून वाजत-गाजत आणतात, गौराईला सोन्या-मोत्याच्या पावलांनी आणले जाते.
पहिल्या दिवशी तिला दुर्वा, कापूस, आघाडा वाहतात आणि मेथीची भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवतात. दुस-या दिवशी तिला पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळतात, हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात; तर नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबिरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा मोठा समारंभ केला जातो.
तिसऱ्या दिवशी तिला खीर-कानवल्याचा (करंजीचा प्रकार मुरड घालून करतात, गौर मुरडून परत यावी म्हणून) नैवेद्य दाखवून तिची पाठवणी (विसर्जन) करतात. अशाप्रकारे ही माहेरवाशीण येते, राहाते आणि डोळ्यात पाणी आठवण म्हणून ठेवते व परत येण्याचे वचन देऊन जाते.
(प्रतिनिधी)