राज्य सरकारच्या 'आर्थिक सल्लागार परिषदे'वर 'ज्युनिअर अदानी'; वाचा, काय आहे जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 05:32 PM2023-02-06T17:32:28+5:302023-02-06T17:33:18+5:30
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आर्थिक सल्लागार परिषदेची घोषणा करण्यात आली होती.
मुंबई - भारताची अर्थव्यवस्था २०२७ पर्यंत ५ लाख कोटी डॉलरपर्यंत नेण्यासाठी महाराष्ट्र राज्याची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था १ लाख कोटी डॉलर बनवण्याचं उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारनं पाऊल उचललं आहे. त्यात सरकार आर्थिक सल्लागार परिषद ही स्वतंत्र संस्था निर्माण करून त्यात विविध उद्योगपतींना स्थान दिले आहे.
विशेष म्हणजे राज्य शासनाच्या या समितीत सध्या देशभरात चर्चेत असलेल्या गौतम अदानी यांच्या सुपुत्राला स्थान देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या हिंडनबर्ग रिपोर्टमुळे गौतम अदानी यांच्या साम्राज्याला धक्का बसला आहे. अदानी समुहाचे शेअर्स कोसळले आहेत. त्यामुळे गुंतवणुकदारांना कोट्यवधीचा फटका बसला असून शेअर मार्केटही बुडाले आहे. यात शिंदे-फडणवीस सरकारनं गौतम अदानी यांचे चिरंजीव करण अदानी यांची शासनाच्या आर्थिक सल्लागार परिषदेवर नियुक्ती केली आहे.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आर्थिक सल्लागार परिषदेची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर शासनाने आज यासंदर्भात जीआरकडून परिषदेतील सदस्यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यात टाटा सन्म समुहाचे एन चंद्रशेखरन यांना आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर रिलायन्सचे अनंत अंबानी, अदानी समुहाचे करण अदानी यांची सदस्यपदी नेमणूक करण्यात आली आहे. या परिषद समितीत एकूण २१ सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
काय आहे जबाबदारी?
- राज्य शासनाकडून परिषदेस करण्यात आलेला कोणताही आर्थिक अथवा अन्य धोरणात्मक मुद्दे, त्यावर राज्य शासनास सल्ला देणे
- अर्थशास्त्रीदृष्ट्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर परामर्श करणे आणि त्यावरील भूमिका सादर करणे
- सर्व क्षेत्रांमधील महत्त्वाच्या निर्देशकांचे मापदंड निश्चित करणे, १ लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्था वाढीसाठी धोरण निश्चित करणे
- यासाठी आगामी ५ वर्षासाठीचा नियोजन आराखडा(5 Year Plan Document) राज्य शासनास सादर करणे
अदानींच्या संपत्तीत घसरण
गौतम अदानी यांच्या संपत्तीत खरी घसरण २१ जानेवारीपासून सुरू झाली. तोपर्यंत हिंडेनबर्गचा रिपोर्ट समोर आला नव्हता. गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती, ज्याकडे सर्वजण सामान्यपणे पाहत होते, परंतु कुणाला काही अंदाज नव्हता की आशियातील सर्वात मोठा उद्योगपती एका मोठ्या कचाट्यात सापडणार आहे. हिंडेनबर्गचा रिपोर्ट समोर आला आणि अदानींच्या शेअर्सने गटांगळी घेण्यास सुरुवात केली. शेवटच्या ट्रेडिंग दिवसापर्यंत म्हणजेच शुक्रवार ३ फेब्रुवारीपर्यंत, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ५९ अब्ज डॉलरवर आली, म्हणजे त्यांची निम्म्याहून अधिक संपत्ती कमी झाली आहे.