‘रेरा’च्या अध्यक्षपदी गौतम चटर्जी
By admin | Published: May 19, 2017 12:33 AM2017-05-19T00:33:24+5:302017-05-19T00:33:24+5:30
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (रेरा)च्या अध्यक्षपदी माजी अतिरिक्त मुख्य सचिव आणि गृहनिर्माण विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव गौतम चटर्जी
- अतुल कुलकर्णी । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (रेरा)च्या अध्यक्षपदी माजी अतिरिक्त मुख्य सचिव आणि गृहनिर्माण विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव गौतम चटर्जी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर सार्वजनिक आरोग्य विभागाचे विद्यमान प्रधान सचिव डॉ. विजय सतबीरसिंग यांचीही सदस्यपदी निवड झाली आहे. त्यामुळे निवृत्त होण्याआधीच त्यांच्यासाठी पुढचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायपालिकेतून बी.डी. कापडणीस यांचीही सदस्यपदी निवड झाली आहे.
चटर्जी यांची अध्यक्षपदी निवड होणार हे वृत्त सगळ्यात आधी लोकमतने २४ आॅक्टोबर २०१६ रोजी दिले होते. चटर्जी यांना हाउसिंग रेग्यूलेटर म्हणून नियुक्तीसाठीच्या कायदेशीर अडचणींवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात गृहनिर्माणविषयक बाबींचा सल्ला देण्यासाठी विशेष कार्य अधिकारी म्हणून नेमले होते. केंद्राच्या कायद्यात हाउसिंग रेग्यूलेटर म्हणून नेमलेली व्यक्ती सध्या गृहनिर्माणविषयक बाबी हाताळणाऱ्या व्यक्तीलाच प्राधिकरणाचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून नेमता येईल, अशी अट होती. चटर्जी परिवहनचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले होते. नव्या नियमानुसार अडचण येऊ नये म्हणून त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात गृहनिर्माणविषयक बाबींसाठीचे विशेष कार्य अधिकारी म्हणून नेमले गेले. या पदासाठी तत्कालीन मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय इच्छुक होते. त्यामुळेच नेमणुकीची फाइल रखडली गेली. क्षत्रिय यांना सेवा हमी कायद्याचे आयुक्त म्हणून नेमले गेल्याने चटर्जी यांचा मार्ग मोकळा झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदस्यपदासाठी तीन नावे होती. त्यातील दोन अधिकारी थेट आयएएस नव्हते. तिसरे नाव विद्यमान प्रधान सचिव विजय सतबीरसिंग यांचे होते. ते जुलैमध्ये निवृत्त होतील. त्यांची यात निवड झाल्याने निवृत्तीनंतर शासकीय जागा मिळविण्यात आयएएस अधिकाऱ्यांचे वर्चस्व कायम राहिले.
प्राधिकरणाच्या अध्यक्षांना पद स्वीकृतीपूर्वी शासनाच्या गृहनिर्माण विभागाचे मंत्री यांच्यासमोर पद व गोपनीयतेची शपथ घ्यावी लागेल.