गवळीला १४ दिवसांची ‘फर्लो’

By admin | Published: March 3, 2016 04:54 AM2016-03-03T04:54:42+5:302016-03-03T04:54:42+5:30

येथील मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गुलाब गवळी यास कुटुंबाच्या भेटीसाठी उच्च न्यायालयाने बुधवारी १४ दिवसांची फर्लो (संचित रजा) मंजूर केली.

Gawli's 14-day 'Fellow' | गवळीला १४ दिवसांची ‘फर्लो’

गवळीला १४ दिवसांची ‘फर्लो’

Next

नागपूर : येथील मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गुलाब गवळी यास कुटुंबाच्या भेटीसाठी उच्च न्यायालयाने बुधवारी १४ दिवसांची फर्लो (संचित रजा) मंजूर केली.
गवळीकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात २८ दिवसांच्या फर्लोसाठी अर्ज करण्यात आला होता, परंतु फर्लोच्या मुदतीचे अधिकार न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. व्ही. एम. देशपांडे यांच्या खंडपीठाने कारागृह प्राधिकाऱ्यांकडे सोपविले. प्राधिकाऱ्यांनी गवळीला १४ दिवसांची रजा मंजूर केली.
गवळीने कारागृह अधीक्षकांकडे फर्लोची मागणी केली होती, परंतु त्याची मागणी फेटाळण्यात आली होती. त्यामुळे त्याने न्यायालयात धाव घेतली होती. यापूर्वीही त्याने मे २०१५ मध्ये उच्च न्यायालयामार्फत मुलाच्या लग्नासाठी पॅरोल (अर्जित रजा) मंजूर करून घेतला होता. आईच्या आजाराचे कारण पुढे करून त्याने ही रजा वाढवून घेतली होती.
साकीनाका भागातील भूखंडाच्या प्रकरणात ३० लाखांची सुपारी घेऊन अरुण गवळी आणि टोळीने मार्च २००८मध्ये घाटकोपर येथील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. विशेष मोक्का न्यायालयाने आॅगस्ट २०१२ मध्ये गवळी आणि अन्य ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. प्रारंभी गवळीला नवी मुंबईतील तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. तेथून त्याला नागपूरच्या कारागृहात स्थानांतरण करण्यात आले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Gawli's 14-day 'Fellow'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.