‘समलिंगी फेसबुक मैत्री’ने केला घात
By admin | Published: February 27, 2017 03:58 AM2017-02-27T03:58:32+5:302017-02-27T03:58:32+5:30
ठाण्यातील तिघांची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. तिघांच्याही मनात काही वेगवेगळे ‘प्लॅन’ शिजू लागले.
पंकज रोडेकर,
ठाणे- ठाण्यातील तिघांची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. तिघांच्याही मनात काही वेगवेगळे ‘प्लॅन’ शिजू लागले. कुणाला शारीरिक भूक भागवायची होती, कुणाच्या मनात सोन्याचा मोह निर्माण झाला होता. योगायोगाने भेट झाली आणि ती त्यांच्यातील दोघांना तुरुंगापर्यंत घेऊन गेली.
ठाण्यात एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू होती. याचदरम्यान, घोडबंदर रोड परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय करणची लोकमान्यनगर येथील १९ वर्षीय संजय आणि संतोष (नावे बदलली आहेत) यांच्याशी फेसबुकवर ओळख झाली. अवघ्या १०-१२ दिवसांत त्यांची मैत्री घट्ट झाली. या मैत्रीमागे तिघांच्याही मनात वेगवेगळे हेतू होते. फेसबुकवरील संवादातून त्यांनी एकमेकांना भेटण्याचे ठरवले. पण, भेटायचे कुठे, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. करणच्या निवासस्थानी तो वरच्या मजल्यावर एकटा, तर त्याचा भाऊ खाली राहत होता. तो समलैंगिक संबंधांसाठी आसुसलेला होता. या लालसेतून त्याने संजय आणि संतोष यांना रात्री घरी येण्याचे निमंत्रण दिले. ही गोष्ट त्याने या कानाची त्या कानाला लागू दिली नाही. करणने ठरवल्याप्रमाणे सर्व काही होत होते. पण, संजय आणि संतोषच्या डोळ्यांसमोर करणच्या गळ्यातील चेन नाचत होती. करणच्या घरी पोहोचल्यानंतर त्यांनी त्याचे हातपाय बांधले. आपल्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावण्याचा प्रयत्न मित्र करीत असल्याचे त्याच्या लक्षात येताच, त्याने विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या दोघांनी चाकू बाहेर काढला. ते पाहून करणने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तेवढ्यात, त्यांनी करणच्या पोटात चाकू भोसकला. करणची आरडाओरड ऐकून खालीच राहणारा त्याचा भाऊ मदतीसाठी धावून आला. त्याने दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडत नसल्याचे पाहून त्याने जोरात धक्का मारून उघडला. त्यावेळी करणचा एक मित्र अर्धवस्त्र अवस्थेत बाहेर आला. त्याने करणच्या भावावर हल्ला चढवला. तो हल्ला चुकवून करणच्या भावाने त्याला लाथ मारली. त्यानंतर, ते दोघेही घाबरून पळून गेले. भावाने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी एका मोठ्या गटारामध्ये उडी घेत धूम ठोकली.
>... आणि झाला उलगडा
नेमके काय झाले, हे त्यावेळी जमलेल्यांना समजले नाही. करण जखमी झाल्याने हे प्रकरण चितळसर पोलिसांपर्यंत पोहोचले.
करण शुद्धीवर आल्यानंतर त्याने एकूणच प्रकाराचा उलगडा केला असता, पोलिसांसह सर्वांनाच धक्का बसला.