अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 08:10 PM2024-10-03T20:10:16+5:302024-10-03T20:11:21+5:30

Geeta Gawli : गीता गवळी या मशाल हाती घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Geeta Gawli is the daughter of gangster politician Arun Gawli may be join Thackeray group | अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?

अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?

Geeta Gawli : मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु केली आहे. मुंबई तर प्रचंड घडामोडी घडत आहेत. भाजपने देखील विधानसभेसाठी मुंबईसाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाकडून राजकीय खेळी खेळण्यात आली आहे. माजी नगरसेविका तथा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची कन्या गीता गवळी शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. तसेच, गीता गवळी या मशाल हाती घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

गीता गवळी भायखळा विधानसभा मतदारंसघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत करण्यासाठी ठाकरे गटाची ही रणनीती असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीवेळी गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. आता मात्र विधानसभेसाठी त्या ठाकरे गटाच्या संपर्कामध्ये असल्याची चर्चा सुरु आहे. ठाकरे गटाचे सचिव तथा आमदार मिलिंद नार्वेकर यांनी गीता गवळी यांची दगडी चाळीत जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आले आहे.

गीता गवळी या आधी नगरसेविका राहिल्या आहेत. अरुण गवळी यांनी स्थापन केलेला अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी या नगरसेविका होत्या. त्याचप्रमाणे आरोग्य समितीच्या अध्यक्षा देखील गीता गवळी होत्या. त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भायखळा विधानसभा मतदारंसघातून इच्छुक आहे. सध्या भायखळा विधानसभा मतदारंसघ शिंदे गटाकडे आहे. शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांचा तो मतदारसंघ आहे. शिंदे गटाला तीव्र विरोध द्यायला ठाकरे गट तयारी करत असून गीता गवळी यांच्या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा रंगली आहे.

अरुण गवळी सध्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणी अरुण गवळी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे अरुण गवळी गेल्या १७ वर्षांपासून जेलमध्ये आहे. दक्षिण मुंबईत अरुण गवळीला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून अरुण गवळी याच्या नावाचा किंवा त्याच्या कुटुंबियांची मदत घेण्याचा प्रयत्न प्रत्येक निवडणुकीत केला जातो. अशातच गीता गवळी यांच्या नव्या राजकीय प्रवासाची चर्चा रंगली असून ठाकरे गटाकडून राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Web Title: Geeta Gawli is the daughter of gangster politician Arun Gawli may be join Thackeray group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.