गीतरामायण शिवधनुष्य पेलण्यासारखे
By admin | Published: March 17, 2015 12:30 AM2015-03-17T00:30:12+5:302015-03-17T00:30:12+5:30
गीतरामायण’ गाणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे असून, त्याचे गायन करणे ही सहजसोपी गोष्ट नाही, असे मत ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांनी सोमवारी व्यक्त केले.
पुणे : ‘गीतरामायण’ गाणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे असून, त्याचे गायन करणे ही सहजसोपी गोष्ट नाही, असे मत ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांनी सोमवारी व्यक्त केले.
सिद्धहस्त कवी ग. दि. माडगूळकर आणि प्रतिभावंत संगीतकार सुधीर फडके यांची अजरामर सांगीतिक निर्मिती म्हणजे ‘गीतरामायण.’ पुणे आकाशवाणीवरून साठ वर्षांपूर्वी प्रसारित झालेले गीतरामायण मराठी सांस्कृतिक विश्वाचा मानबिंदू ठरले आहे. या गीतरामायणाच्या हीरकमहोत्सवाचे औचित्य साधून नव्या पिढीतील गायक-गायिकांनी या निर्मितीचा आस्वाद घ्यावा यासाठी गदिमा प्रतिष्ठान व स्वरानंद प्रतिष्ठानच्या वतीने गीतरामायण स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यातील निवडक ११ स्पर्धकांची अंतिम फेरी निवारा सभागृहात झाली. पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी श्रीधर फडके बोलत होते.
गदिमा प्रतिष्ठानचे विश्वस्त श्रीधर माडगूळकर, कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर, स्वरानंदचे प्रकाश भोंडे उपस्थित होते. स्पर्धेत अमिता घुगरी हिने प्रथम क्रमांक पटकाविला. शंतनू पानसे द्वितीय, तर स्वामिनी कुलकर्णी तृतीय आली. विजेत्यांना या वेळी पारितोषिके देण्यात आली.
आजवर अनेक सुगमसंगीताच्या स्पर्धा घेण्यात आल्या. मात्र, प्रथमच गीतरामायणासारख्या शास्त्रीय संगीतावर आधारित गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, ही खूप आनंदाची गोष्ट असल्याचे सांगून फडके म्हणाले, ‘‘लय, बाज, भाव, स्वरांचा लगाव यांचे मिश्रण म्हणजे गीतरामायण. उत्तम कसं गावं, सादरीकरण कसं करावं, त्यात भावनिक ओलावा कसा आणावा याचे शिक्षण गीतरामायणातून मिळते. गीतरामायण हे अजरामर काव्य असल्याने पुढील अनेक पिढ्या याचे गायन करतील.’’
आनंद माडगूळकर म्हणाले, ‘‘गीतरामायणाला अनेक पदर असून, विविध भावनांच्या छटा त्यात अनुभवायला मिळतात. त्याचे आकलन करणे ही खूप अवघड गोष्ट आहे. समर्पित भावनेने तल्लीनतेने ते सादर होणे आवश्यक आहे. गीतरामायणाची तयारी करताना त्यासाठी जास्तीतजास्त वेळ दिला गेला पाहिजे. चित्रपटातील गाणी किंवा भावगीत म्हणण्यासारखे ते सोपे नाही. आज नदीच्या मुखातून महासागरात प्रवेश करीत आहात, त्यातूनच गीतरामायणासारखी अनेक रत्नं तुमच्या हाती गवसणार आहेत.’’
शैला मुळगंद यांनी सूत्रसंचालन केले, तर स्पर्धेचे समन्वयक आणि स्वरानंदचे विश्वस्त विजय मागीकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
पहिला गीतरामायणाचा कार्यक्रम
४माझ्या आणि आनंदच्या मुंजीनिमित्त एखादा सांस्कृतिक कार्यक्रम व्हावा, अशी उपस्थितांची इच्छा होती. त्या वेळी बाबूजी यांचे गाणे आणि गदिमा यांच्या उत्कृष्ट निवेदनातून कार्यक्रम रंगत गेला. इतका की हा कार्यक्रम ऐकून शेजारची मंडळी, आसपासचे लोक घरच्या परिसरात जमा झाले. तब्बल १००० श्रोते उपस्थित होते. गीतरामायणाचा तो पहिला कार्यक्रम होता, अशा गीतरामायणाच्या आठवणींना श्रीधर माडगूळकर यांनी उजाळा दिला.