पाकमधून परतलेल्या गीताचा मराठवाडा दौरा लांबणीवर;  कुटुंबीयांचा मराठवाड्यात शोध का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 03:49 AM2020-12-02T03:49:29+5:302020-12-02T07:26:33+5:30

सांकेतिक भाषा विशेषज्ज्ञ कोरोना संक्रमित : पंधरवडाभर उशीर होण्याची शक्यता

Geeta's return to Marathwada tour postponed; Why search for family members in Marathwada? | पाकमधून परतलेल्या गीताचा मराठवाडा दौरा लांबणीवर;  कुटुंबीयांचा मराठवाड्यात शोध का?

पाकमधून परतलेल्या गीताचा मराठवाडा दौरा लांबणीवर;  कुटुंबीयांचा मराठवाड्यात शोध का?

Next

इंदूर (मध्य प्रदेश) : पाकिस्तानमधून पाच वर्षांपूर्वी भारतात परतलेली मूकबधीर युवती गीता आपल्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी २ डिसेंबरपासून मराठवाड्यातील जालना, परभणी नांदेड तसेच शेजारी तेलंगणा राज्यात येणार होती. परंतु, ऐनवेळी तिचा दौरा लांबणीवर टाकण्यात आला आहे. तिच्याबरोबर येणारे सांकेतिक भाषा विशेषज्ज्ञ कोरोना व्हायरसने संक्रमित झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मध्यप्रदेशच्या सामाजिक न्याय विभागाच्या संयुक्त संचालक सुचिता तिर्की यांनी मंगळवारी सांगितले की, आपल्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी गीता बुधवारपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार होती. परंतु, तिच्यासोबत जाणारे सांकेतिक भाषा विशेषज्ज्ञ कोरोना संक्रमित झाल्याने हा दौरा आता पंधरवड्यासाठी लांबणीवर टाकला आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील पाच वर्षांपासून देशाच्या विविध भागांतील २० कुटुंबीयांनी गीता हीच आपली मुलगी असल्याचे सांगितलेले आहे. परंतु, या कोणत्याही कुटुंबाचा गीतावरील दावा सिद्ध होऊ शकलेला नाही. इंदूरमध्ये दिव्यांगांसाठी काम करणारी आनंद सर्व्हिस सोसायटी सध्या गीताची देखभाल करीत आहे. तिच्या कुटुुंबीयांना शोधण्याची जबाबदारी राज्य सरकारने याच संस्थेवर सोपविलेली आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गीता ही खाणाखुणा करून बालपणीच्या काही आठवणी सांगत आहे. त्यावरून ती मूळची मराठवाडा किंवा त्याला लागून असलेल्या तेलंगणामधील रहिवासी असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ती दोन दशकांपासून तिच्या कुटुंबीयांपासून दूर झाली होती.

गीता सध्या ३० वर्षे वयाची असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ती बालपणी चुकीने रेल्वेगाडीत बसून सुमारे २० वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये गेली होती. पाकिस्तानी रेंजर्सला ती लाहोर रेल्वेस्थानकावर समझोता एक्स्प्रेसमध्ये बसलेली आढळली होती.
देशाच्या तत्कालीन विदेशमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ती २६ ऑक्टोबर रोजी भारतात परतू शकली होती. त्यानंतर ती इंदूरमधील स्वयंसेवी संस्थेत वास्तव्य करीत आहे व आपल्या कुटुंबीयांचा शोध घेत देशाच्या विविध भागांत फिरत आहे.

गीताच्या कुटुंबीयांचा मराठवाड्यात शोध का?
सांकेतिक भाषातज्ज्ञांनी तिच्याशी चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्या असून, तिच्या बालपणीच्या आठवणी जागृत करीत आहेत. तिने खाणाखुणांद्वारे दिलेल्या माहितीनुसार, तिच्या गावाजवळ एक रेल्वेस्थानक आहे. गावाजवळ नदी असून, नदीच्या किनाऱ्यावर देवीचे एक मंदिर आहे. मराठवाड्यातील जालना, परभणी नांदेड व शेजारी तेलंगणा राज्यात अशी काही ठिकाणे असून, तेथे गीताला घेऊन ते जाणार आहेत.
सांकेतिक भाषातज्ज्ञांनी तिच्याशी चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्या असून, तिच्या बालपणीच्या आठवणी जागृत करीत आहेत. तिने खाणाखुणांद्वारे दिलेल्या माहितीनुसार, तिच्या गावाजवळ एक रेल्वेस्थानक आहे. गावाजवळ नदी असून, नदीच्या किनाऱ्यावर देवीचे एक मंदिर आहे. मराठवाड्यातील जालना, परभणी नांदेड व शेजारी तेलंगणा राज्यात अशी काही ठिकाणे असून, तेथे गीताला घेऊन ते जाणार आहेत.

Web Title: Geeta's return to Marathwada tour postponed; Why search for family members in Marathwada?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.