राज्यात ९ हजार मेगावॅट औष्णिक वीज तयार करा, ऊर्जा विभागाच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 08:39 AM2022-04-20T08:39:44+5:302022-04-20T08:40:19+5:30
वीज टंचाईवर मात करण्यासाठी दीर्घकालीन व तात्कालिक अशा दोन्ही उपाययोजना करा.
मुंबई : राज्यात विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन आठ हजार मेगावॅट औष्णिक वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवून तातडीच्या उपाययोजना करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिले. ऊर्जा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
वीज टंचाईवर मात करण्यासाठी दीर्घकालीन व तात्कालिक अशा दोन्ही उपाययोजना करा. विजेसंदर्भात जे निर्णय घेतले जातील, त्याच्या अंमलबजावणीचा आपण दर आठवड्याला आढावा घेऊ. आधीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीचाही आढावा घेतला जाईल, असे मुख्यमंत्री या बैठकीत म्हणाले.
बैठकीला ऊर्जामंत्री नितीन राऊत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
- राज्याचा हक्काचा आणि दर्जेदार कोळसा राज्याला नियमितपणे मिळेल यासाठी पाठपुरावा करा.
- उरण येथील गॅस प्रकल्प सुरू करण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांशी तसेच पंतप्रधानांशी आपण स्वत: बोलू.
पाच दिवसांपासून भारनियमन नाही : ऊर्जामंत्री राऊत
ऊर्जामंत्री राऊत यांनी सांगितले की, राज्यात भारनियमन करावे लागू नये म्हणून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांना यश मिळत असल्याचे व पाच दिवसांपासून भारनियमन करण्यात आलेले नाही. एकट्या महाराष्ट्रातच नाही, तर देशात विजेची टंचाई आहे. कोळशाचा अपुरा पुरवठा हे त्यामागचे मुख्य कारण असून, इतर १२ राज्यांतही कोळशाअभावी भारनियमन सुरू आहे. दरदिवशी २५०० मेगावॅट विजेचा तुटवडा आहे. विभागाने २० लाख मेट्रिक टन कोळसा आयात करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. महावितरणच्या स्तरावर चार लाख मेट्रिक टन कोळसा आयात करण्याचे कार्यादेश दिले आहेत.