संतांमुळेच बहुजन साहित्याची निर्मिती

By admin | Published: January 1, 2015 02:30 AM2015-01-01T02:30:49+5:302015-01-01T02:30:49+5:30

साहित्य लेखनाची व निर्मितीची विशिष्ट वर्गाकडे असणारी मक्तेदारी मोडून काढण्याचे क्रांतिकारक कार्य संतांनी केले.

Generation of Bahujan Literature due to Saints | संतांमुळेच बहुजन साहित्याची निर्मिती

संतांमुळेच बहुजन साहित्याची निर्मिती

Next

मालगाव (सांगली) : साहित्य लेखनाची व निर्मितीची विशिष्ट वर्गाकडे असणारी मक्तेदारी मोडून काढण्याचे क्रांतिकारक कार्य संतांनी केले. त्यामुळेच बहुजन समाजाला साहित्य निर्मितीचा अधिकार मिळाला, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
आरग येथे आयोजित पारिवारिक साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. डॉ. मोरे म्हणाले की, जाती व्यवस्थेमुळे साहित्य निर्मितीत अधिकार भेद होता. हा अधिकार एका विशिष्ट वर्गाकडेच होता. संतांनी तेराव्या शतकात एकाधिकारशाहीला आव्हान देत साहित्य निर्मितीची मक्तेदारी मोडून काढली. या क्रांतिकारक निर्णयामुळेच संत चोखोबा यांच्या रूपाने बहुजन समाजाला साहित्य निर्मितीचा अधिकार मिळाला. काव्यस्फूर्ती ज्या त्या वेळी शब्दरूपात आणली पाहिजे, अन्यथा ती पडद्याआड जाते. संतांनंतर पंडित व शाहिरांनी काव्यरचनेचा प्रयोग केला, परंतु तो संत साहित्यासारखा टिकला नाही. साहित्य आणि वाचक यांचा सहभाग असल्यानेच संत साहित्य टिकून राहिले. मराठी भाषेचा वारसा संतांकडून आला. त्यांनीच मराठी भाषा घडविली. संत साहित्यावर टीका करणाऱ्या अनेकांना साहित्य निर्मितीसाठी संतांच्या विचाराचा आधार घ्यावा लागला हे वास्तव आहे. महात्मा फुले यांनीही संत साहित्याच्या माध्यमातून जनजागृती केली. संतांचे विचार संमेलनाच्या माध्यमातून पोहचविण्याची गरज आहे. आधुनिक साहित्याशी संत साहित्याचा संबंध काय आहे, हे घुमान येथील साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सांगण्याचा आपला प्रयत्न असेल, असेही मोरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Generation of Bahujan Literature due to Saints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.