महिन्यापासून परळीची वीजनिर्मिती ठप्प!
By admin | Published: October 24, 2015 03:20 AM2015-10-24T03:20:29+5:302015-10-24T03:20:29+5:30
परळी औष्णिक विद्युत केंद्रातील ५ संच महिन्यापासून पाण्याअभावी बंद ठेवण्यात आले आहेत. पाण्याचे संकट कायम असल्याने संपूर्ण विद्युत केंद्र बंद ठेवण्यात आल्याने
परळी (जि. बीड) : परळी औष्णिक विद्युत केंद्रातील ५ संच महिन्यापासून पाण्याअभावी बंद ठेवण्यात आले आहेत. पाण्याचे संकट कायम असल्याने संपूर्ण विद्युत केंद्र बंद ठेवण्यात आल्याने वीज निर्मिती ठप्प झाली आहे.
इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण औष्णिक विद्युत केंद्र बंद ठेवण्याची वेळ आली आहे. परळी औष्णिक विद्युत केंद्राला खडका बंधाऱ्यातून वीज निर्मितीसाठी पाणी पुरवठा होतो. खडका धरणात पाणीसाठाच नसल्याचे मुख्य अभियंता आर.बी. गोहणे यांनी सांगितले. येथील केंद्रात निर्माण होणारी ग्रीडमध्ये पाठविली जाते. बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी जिल्ह्याला ही वीज मिळत होती. औष्णिक केंद्र बंद असल्याने ग्रामीण भागात सहा तासांपर्यंत भारनियमन वाढल्याची माहिती सहायक अभियंता सुहास मिसाळ यांनी दिली.
केंद्रात २१० मेगावॅट क्षमतेचे ३, ४, ५ हे तीन संच आहेत. तर नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रात २५० मेगावॅट क्षमतेचे ६ व ७ हे दोन संच आहेत. पाच संचाची एकूण क्षमता १,१३० मेगावॅट असताना प्रत्यक्षात मात्र ६०० ते ७०० मेगावॅट एवढीच वीज निर्मिती होत होती. (प्रतिनिधी)