परळी औष्णिक केंद्रात आॅईलद्वारे वीज निर्मिती
By admin | Published: March 5, 2016 04:07 AM2016-03-05T04:07:15+5:302016-03-05T04:07:15+5:30
तालुक्यातील दाऊतपुर शिवारात महाराष्ट्र राज्य विजनिर्मिती कंपनीने दोन हजार कोटी रुपये खर्चून उभारलेल्या २५० मेगा वॅट क्षमतेच्या संच क्रमांक ८ मधून शुक्रवारी आॅईलद्वारे वीज निर्मिती करण्यात आली.
परळी (बीड) : तालुक्यातील दाऊतपुर शिवारात महाराष्ट्र राज्य विजनिर्मिती कंपनीने दोन हजार कोटी रुपये खर्चून उभारलेल्या २५० मेगा वॅट क्षमतेच्या संच क्रमांक ८ मधून शुक्रवारी आॅईलद्वारे वीज निर्मिती करण्यात आली. पाण्याअभावी संथ झालेल्या विद्युतनिर्मिती केंद्राच्या कामाला यामुळे नवीन गती मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनीचे (प्रकल्प) कार्यकारी संचालक अनिल नंदनवार, एस.डी. देवतारे, परळीचे मुख्य अभियंता खटारे, उपमुख्य अभियंता डी.आर. मुंडे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
या नविन संचातून पहिल्यांदाच १५ मे.वॅ. एवढी विजनिर्मिती झाली. संच क्र. ८ हा वीज निर्मितीसाठी सज्ज झाला आहे. पाण्याचा प्रश्न असल्याने हा संच चालू करुन बंद करुन ठेवला आहे. १५ दिवसानंतर २५० मे.वॅ. ऐवढ्या पूर्ण क्षमतेने हा संच तीन दिवस चालविण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पाण्याअभावी गेल्या पाच महिन्यापासून परळी औष्णिक विद्युत केंद्रातील पाच संच बंद ठेवण्यात आले आहेत. संच क्र. ३, ४, ५ व ६,७ हे पाच संच परळी औष्णिक केंद्रात आहेत. जुन्या परळी औष्णिक विद्युत केंद्रात २१० मे.वॅ. क्षमतेचे तीन संच तर नविन परळी औष्णिक विद्युत केंद्रात २ संच आहेत. या पाच संचाची स्थापीत क्षमता ११३० मे.वॅ. एवढी आहे. त्यात आता नविन संच क्र. ८ ची २५० मे.वॅ. ने भर पडणार आहे. (प्रतिनिधी)